मुंबई :- महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या प्रत्येक कामाशी निगडीत विभाग आहे. महसूल विभागाची सर्वसमावेशक कामे, सुविधा, योजनांच्या परिणामकारक अंमलबजाणीमुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावली जाते. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात राबविण्यात येत असलेला शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलद गतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
महसूल विभाग अंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रम, योजनांचा आढावा महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव अजित देशमुख, धनंजय निकम, सत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, नागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा online देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा. यामध्ये जमीन पोर्टल, महाखनिज पोर्टल, आपली चावडी, ई चावडी यासारख्या प्रणालींचा वापर करावा.
महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात. नोंदणी व मुद्रांक विभागातील कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजना, उपक्रमांचा आढावा घ्यावा, अशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.