जळगाव: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेलं असतानात आता जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून जळगावात जावयाची निर्घृण हत्या केली आहे. मुकेश शिरसाट असे हत्या झालेल्या 26 वर्षीय तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.
विवाहाच्या सूडातून झालेल्या जळगावच्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्याचा थरकाप उडाला आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या कुटुंबियांनी जावयाला एकटं गाठून कोयता, चॉपरचे वार करत संपवल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात तणावाचे वातावरण आहे. एवढंच नाही तर मुकेश शिरसाठला मारहाण करताना मध्ये पडलेल्या त्याच्या घरातील 7 जणांवर वार करत गंभीर जखमी करण्यात आल्यानंतर मृत तरुणाच्या चुलत्याने या बदल्याचा विडा उचलला आहे. आपण प्रेम विवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी आपल्या पतीची हत्या केली आहे म्हणत मुकेशच्या पत्नीने टाहो फोडला होता. प्रेमविवाहानंतर डूक धरून पाच वर्षांनी माहेरच्या लोकांनीच नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं. या हत्येने आपलं आणि आपल्या लहान मुलींचे आयुष्य अंधारात गेलं आहे. आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत मुकेशच्या पत्नीने केली आहे. पूजाच्या आर्त हंबरड्यानं जळगावसह गाढे नगरसह संपूर्ण गाव गहिवरला होता.
काय झाले होते?
पाच वर्षांपूर्वी जळगावात मुकेश शिरसाठने बनसोडे कुटुंबातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं. प्रेमविवाह केल्यामुळे तेंव्हापासून पूजाच्या माहेरील कुटुंबाचे आणि शिरसाठ कुटुंबियांचे संबंध बिनसलेले होते. या लग्नानंतर मुकेश पहिल्यापासूनच टार्गेटवर होता. रविवारी सकाळी तो दुकानात एकटा जात असताना पूजाच्या कुटुंबियांनी त्याला गाठले आणि कोयता चॉपरचे वार करत निर्घृणपणे मुकेशची हत्या केली. त्याला मारताना मध्ये पडलेल्या त्याच्या घरातील त्याचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीणीवरही वार करत जखमी केले. या प्रकरणात आता पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आता आपण पळून जाऊन लग्न केल्यामुळं मुकेशची हत्या झाली. त्याची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मुकेशची पत्नी पूजा हिने केली आहे.
पिंप्राळा हुडको परिसरात तणावपूर्ण शांतता
जळगावातील घटनेने पिंप्राळा हुडका परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. मुकेशच्या हत्येने कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय. संतापानं त्वेषाने पेटलेल्या पूजाच्या कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे. मयत तरुणाचे काका निळकंठ शिरसाठ म्हणाले,“मुकेशचे त्यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाल्यामुळे सासरच्या मंडळींशी जुने वाद होते. त्यांनी हे वाद कधीही संपवले नाहीत, उलट त्याला त्रास देण्यासाठी नेहमीच संधी शोधत राहिले.
रविवार असल्याचं त्यांना माहिती होतं, त्यामुळे तो घरी असेल याची खात्री करून त्यांनी आधीच जमाव जमवला. यांच्यासोबत आपण काहीतरी करू. त्यामुळे त्यांनी असे काम केले. कोयते, रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली, विटा देखील फेकण्यात आल्या. 25 ते 30 जणांनी हल्ला केला. त्यांना वाटत असेल की, त्यांनी आमच्या पोराला मारले आहे. त्यांचे देखील आम्ही एक-दोन खल्लास करू, तरच आम्ही राहू, असे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे लग्नाला तीन-चार वर्षे लोटूनही पूजाच्या माहेरच्यांकडून सातत्याने वाद निर्माण केले जात होते. अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही गेले.पूजाच्या घरचे वारंवार तिला आणि मुकेशला जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते. पण कौटुंबिक वादामुळे पोलिसांनी कोणतीही कठोर भूमिका न घेता दोन्ही कुटुंबियातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला.पण मुकेशच्या काटा काढायचाच हे पूजाच्या माहेरच्यांच्या डोक्यात होते. सोमवारी (20 जानेवारी) मुकेश कामासाठी घरातून बाहेर पडला असतानाच पूजाच्या कुटुंबियांनी मुकेशवर धारधार शस्त्राने वार केले. मुकेशला वाचवण्यासाठी गर्भवती पूजाने घरातून बाहेर धाव घेतली तर तिच्यावरही वार करून तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी मुकेशच्या कुटुंबियांवरही हल्ला केला. सुदैवाने पूजा बचावली. पण आपल्याच माहेरच्यांनी मुकेशची हत्या केली आणि आपल्यावरही वार केले,असा आरोप पूजाने केला आहे.
नणंदेने वाचवला पूजाचा जीव
मुकेशला वाचवण्यासाठी काही लोक पुढे सरसावले, पण जमावाने त्यांच्यावरही हल्ला चढवला. दरम्यान,मुकेशची गर्भवती पत्नी पूजा हिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पूजाची नणंद वेळीच घटनास्थळी पोहोचली आणि तिच्या हस्तक्षेपामुळे गर्भवती पूजा या हल्ल्यातून बचावली.
मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्या लोकांनी हत्या केल्यामुळे जळगावात शोककळा पसरली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार ते पाच जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुकेश आणि पूजा यांना तीन वर्षांची मुलगी असून पूजा गर्भवती आहे. अशा परिस्थितीत मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या अमानवी कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मुकेशच्या बहिणीने हल्लेखोरांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. तिने न्यायासाठी आवाज उठवताना, दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा आग्रह धरला आहे.