सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं कुटुंब रस्त्यावर येणार? नक्की काय आहे प्रकरण?

डिजिटल पुणे    21-01-2025 11:26:56

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. अक्षयच्या वडिलांनी एका खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरल्याने बँकेद्वारे जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे. त्यामुळे जर कर्जाची परतफेड केली नाही तर अक्षय शिंदेचं कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.

अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी खासगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचार प्रकरणाबद्दल माहिती समोर आली आणि महाराष्ट्रभर संतापाची लाट पेटली. अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाली. तेव्हा शिंदे कुटुंब काही दिवसांसाठी बदलापूर सोडून एका अज्ञातस्थळी राहायला गेलं होतं.

अज्ञात ठिकाणी राहायला गेल्यावर अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्याकडे काम नव्हते. परिणामी त्यांना कर्जाचे हफ्ते भरता आले नाही. बरेच दिवस हफ्ते न भरल्याने बँकेने घरावर थेट जप्तीची नोटीस लावली. प्राथमिक माहितीनुसार, ४ डिसेंबर २०२४ रोजी ही नोटीस लावण्यात आली आहे. नोटीस लावल्यापासून पुढे ६० दिवसात थकीत २ लाख १६ हजार रुपये रक्कम भरा, अन्यथा घर ताब्यात घेऊन जप्त केले जाईल असा उल्लेख बँकेच्या नोटीसमध्ये आहे, असं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे.

एन्काऊंट संशयास्पद

बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस कोठडीदरम्यान त्याने पोलिसांवर हल्ला केला. पुढे प्रतिहल्ल्यात त्याचा एन्काऊंट झाला असे म्हटले जात होते. पण अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीसच जबाबदार असल्याचे न्यायालयाने अहवालामध्ये नमूद केले आहे. आत्मरक्षणासाठी गोळ्या चालवल्या असा पोलिसांनी दावा केला होता. आता हा दावा संशयास्पद असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र, चौकशी अहवालात हे स्पष्ट झाले की, त्याच्या बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स सापडले नाहीत. यामुळे या एन्काऊंटरच्या सत्यतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत आणि न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. तळोजा कारागृहातून नेत असताना मुंब्रा बायपास य़ाठिकाणी त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार केला, यातच त्याचा मृत्यू झाला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती