मुरगूड : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे १ फेब्रुवारी २०२५ पासून गाळपासाठी येणा-या उसाला प्रति टन रू. ३२०० रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४- २५ दिनांक २३. ११. २०२४ रोजी सुरु झाला आहे. आजअखेर कारखान्याने ३, ८८, ००० टन उसाचे गाळप केले आहे. १२.४४ च्या उताऱ्याने ३, २८, ००० क्विंटल इतकी साखर उत्पादित केली आहे. कारखान्याना यापूर्वीची १५ जानेवारीपर्यंत प्रतिटन रू. ३१०० व त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत प्रतिटन रू. ३१५० प्रमाणे उसबिले अदा करत आहे. त्याचबरोबर तोडणी- वाहतूक कंत्राटदारांची बिलेही निर्धारित वेळेत अदा केलेली आहेत. कारखान्याने दिनांक ०१. ०२. २०२५ पासून गाळपास येणाऱ्या उसाची बिले रु. ३२००/- ने अदा करण्याचे निश्चित केले आहे.
कारखान्यास यंदा १६२. ०० लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. आज आखेर ७० लाख लिटर्सचे उत्पादन केले असून प्राप्त इथेनॉल पुरवठ्याच्या उद्दिष्टाची पूर्तता वेळेत पूर्ण करण्याचे निश्चित केलेले आहे. सहवीज प्रकल्पातून वीज निर्मिती देखील चालू असून आज अखेर वीज निर्मिती ५ कोटी ४० लाख युनिट झाली असून करखण्याला वापर करून २ कोटी ३७ लाख युनिटचा वीज कंपनीला वीज पुरवठा केलेला आहे.
श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे, सरसेनापती साखर कारखाना चांगला उसदर देण्यात नेहमीच अग्रभागी राहिलेला आहे. त्यामुळे चालू हंगामात पिकवलेला सर्व उस आमच्या कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.