सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांची दिलगिरी! शिवाजी महाराजांबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

डिजिटल पुणे    05-02-2025 12:26:10

 पुणे: ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली होती. नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अखेर शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, यासाठी शिवप्रेमींनी त्यांच्या घराबाहेर निदर्शने केली. पुढे वरिष्ठ पोलिसांच्या आदेशाने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. कोथरूडमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली. राहुल सोलापूरकर यांनी फेसबुक लाईव्ह करत माफी मागितली.

शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, असा खुलासा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. वादग्रस्त विधानावर राहुल सोलापूरकर यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली? याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले, असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं.

शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. रोहित पवार म्हणाले की, “अडगळीत पडलेल्या एका अभिनेत्याने चर्चेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लाघ्य विधान केलं नाही ना? तसं नसेल तर या विधानामागील हेतू आणि सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधणं गरजेचं आहे. काही वेडपट माणसं छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी चुकीची विधानं कुणाच्या आशीर्वादाने करतात?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी पुढे म्हणाले की, “महापुरुष हे केवळ महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी नाही तर सर्वांसाठीच पूजनीय आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करणं थांबवलं पाहिजे, अन्यथा अशा महाभागांना मराठी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही…” असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती