उरण : दरवर्षी गुरुपौर्णिमेला न विसरता आपल्याला शिकविणाऱ्या शिक्षकांची नियमित भेट घेणे, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून मनमोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन तातडीने मदत करणे, सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचे काम गेली १५ वर्षे आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत करत आहेत. शनिवारी (ता. ८) त्यांनी आपल्याला शिकविणाऱ्या सातारा परिसरातील शिक्षकांना घरी म्हणजेच 'सुखकर्ता' बंगल्यावर आणले. त्यात लोखंडे सर, अरविंद ढाणे सर, गोरड सर यांचा कुटुंबासह सहभाग होता. या शिक्षकांनी त्यांना पाचवी ते दहावीत १९८० च्या दशकात शिकविलेले आहे.
महेंद्रशेठ घरत यांचे शिक्षकांवर एवढे प्रेम आहे की त्यांनी या शिक्षकांना चक्क तीन दिवस तहानभूक विसरून, स्वतःची कामे बाजूला ठेवून या शिक्षकांना आनंद देण्यासाठी पायाला भिंगरी लावल्यागत पर्यटन घडवले. आपल्या आलिशान गाडीत स्वतः स्टेअरिंग हाती घेऊन मुंबई दर्शनमध्ये 'ताज' हाॅटेलमधील लज्जत, नरिमन पाईंट, लीलावती हाॅस्पिटल, गेट-वे ऑफ इंडिया, रामशेठ ठाकूर यांनी नयनरम्य अशी विकसित केलेली रामबाग, पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले आर्टस, सायन्स ॲण्ड काॅमर्स महाविद्यालय, जेएनपीटी प्रशासकीय भवन आणि चक्क अत्याधुनिक लाँचद्वारे जेएनपीटी जेट्टी ते घारापुरीपर्यंत अथांग समुद्राची सफर... या साऱ्या पर्यटनमय प्रवासात स्वतः महेंद्रशेठ घरत शिक्षकांच्या हाताला धरून त्यांना वयानुरूप प्रवासात चढ-उतार करीत असताना साथ देत होते.
शिक्षकांची राहण्याची, खाण्याची आलिशान सोय महेंद्रशेठ घरत आणि शुभांगी घरत यांनी केली होती. दोन आलिशान गाड्या, इतर दोन-तीन सहकारी शिक्षकांच्या साथीला देऊन शिक्षकांना आपल्या घरी कोणतीही उणीव भासणार नाही, याची काळजी घेतली. स्वतः शिक्षकांशी सतत संपर्कात राहून त्यांना काही हवे-नको विचारत होते. ही किमया फक्त आणि फक्त महेंद्रशेठच करू शकतात, अशाही भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.
''घरच्या मंडळींपेक्षा महेंद्रच आमची अधिक काळजी घेतोय, आम्ही आयुष्यात पर्यटनाचा अत्यानंद पहिल्यांचा घेत आहोत, आम्ही स्वप्नातही पाहिले नव्हते असा आनंद आम्हाला महेंद्र आणि शुभांगी घरत यांनी दिला,'' अशा भावना लोखंडे, गोरड, ढाणे सरांनी व्यक्त करून आपल्या या लाडक्या विद्यार्थ्याला स्वतःची तब्बेत सांभाळण्याच्या सूचनाही केल्या.
सोमवारी (ता. १०) महेंद्रशेठ घरत यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण-कोपर या हायस्कूलमधील आपल्यासोबत शिकत असलेली वर्गमैत्रीण भारती देशमुख आणि त्यांचे पती प्रदीप देशमुख यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य निरोप समारंभ शेलघर येथे आयोजित केला होता. लोखंडे सर, ढाणे सर, गोरड सर, व्ही. एस. म्हात्रे, रत्नमाला म्हात्रे, ज्योत्स्ना ठाकूर, तसेच आमदार महेश बालदी, उद्योजक सुनील म्हसकर, पी. डी. देशमुख यांच्या उपस्थितीत दणक्यात निरोप समारंभ करून भारती देशमुख या आपल्या वर्गमैत्रिणीलाही सुखद धक्का दिला.
एकंदरितच तीन दिवस पर्यंटन आणि चौथ्या दिवशी सुखरूप सातारा परिसरातील त्यांच्या गावी आलिशान गाडीत शिक्षकांना पोहोच करूनच महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या इतर नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हे अनोखे नाते जपण्यात, सांभाळण्यात महेंद्रशेठ घरत यांचा कुणीही हात धरू शकत नाही, तसेच 'आचार्य देवो भव:' माननारा नेता महेंद्रशेठ घरत, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.
एकंदरितच महेंद्रशेठ घरत हे राजकारणापलीकडे विचार करून विद्यार्थी-शिक्षक-मित्र-पत्रकार आणि व्यवसाय सांभाळून आपली यशस्वी वाटचाल करीत असल्याने परिसरात महेंद्रशेठ घरत यांच्याविषयी कुतूहल आहे.