सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 पूर्ण तपशील

भोसरीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह मोशीमध्ये सापडला; पोलिसांचा तपास सुरू

अजिंक्य स्वामी    24-02-2025 15:52:20

पिंपरी-चिंचवड : भोसरी येथून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह मोशीमधील मटर चौकाजवळ उघड्या मैदानात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका गोणीमध्ये भरून टाकण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा संशय व्यक्त केला असून, अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

ओळख पटलेली महिला रोजंदारीवर काम करणारी होती

मृत महिलेची ओळख तनू साहू (मूळची छत्तीसगडची) अशी पटली आहे. त्या आपल्या कुटुंबासोबत भोसरीत राहत होत्या आणि रोजंदारीवर काम करत होत्या, अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाथारे यांनी दिली.

शेवटचा कॉल पतीला, पण मिसिंग कम्प्लेंट नव्हती दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनू साहू यांनी शेवटचा फोन आपल्या पतीला केला होता. पोलीस तपासादरम्यान तिचा मोबाईल क्रमांक शोधून पतीशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. मात्र, पतीने पत्नी बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे नोंदवली नव्हती. तो स्वतः तिचा शोध घेत होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

मृतदेहाची दुर्दशा, नेमके कारण गुलदस्त्यात

मृतदेह पूर्णपणे कुजलेला अवस्थेत आढळून आल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोस्टमार्टम करण्यात आले असून, अधिक तपासासाठी व्हिसेरा केमिकल विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कामाच्या शोधात पुण्यात स्थायिक झालेले दांपत्य

तनू साहू आणि त्यांचे पती दोन वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आले होते आणि भोसरीत राहत होते. पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, विविध शक्यता तपासून आरोपी आणि खूनामागील हेतू शोधण्याचे काम सुरू आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाथारे यांनी सांगितले.हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून त्वरीत कारवाई आणि दोषींना कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती