पुणे : राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. एसटी बसमध्ये हा प्रकार घडल्यानं विद्येच्या माहेरघरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या शोधासाठी 8 पथकं रवाना करण्यात आली आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुण्यात कामाला होती. घटनेच्या दिवशी ती सकाळी साडेपाच ते पावणेसहा दरम्यान ही तरुणी फलटणला आपल्या गावी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट डेपोत आली. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीच्या आजुबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही तरुणी ज्याठिकाणी बसली होती, तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती. आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीशी गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते ताई? असे त्याने तरुणीला विचारले. त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की, सातारची बस तिकडे लागली आहे. त्यावर तरुणी म्हणाल की, सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथे बसलेय. पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे, मी तुला तिकडे घेऊन जातो, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही मुलगी बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला. अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
या मुलीने आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर आम्ही लगेच स्वारगेट एसटी डेपोचे सीसीटीव्ही फुटेज बघितले. यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली. हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरुर येथे राहणारा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आम्ही या घटनेनंतर आरोपीला शोधण्यासाठी आठ पथके तयार केली. या टीम आरोपीचा शोध घेत आहेत. आमही जवळपासच्या शेतांमध्ये डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने तपास सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
"पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत धक्कादायक आहे. ही घटना चक्रावून टाकणारी आहे. 15 वर्षापूर्वीचं पुणे आणि आताचं पुणे फार बदललं आहे. आपण सुरक्षीत घरी पोहोचू याची अगोदर हमी होती, मात्र आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. पुण्यातील शाळा कॉलेज, बसस्थानक परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पुण्यातील सुरक्षेसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं. पुणे पोलिसांचं नेमकं काय सुरू आहे, याचा जाब पालकमंत्र्यांनी पुणे पोलिसांना विचारावा," असा हल्लाबोल उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.