पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आज (26 फेब्रुवारी) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून आरोपी फरार आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील आरोपीचा फोटो समोर आला असून दत्तात्रय रामदास गाडे असे या नराधमाचे नाव आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा फोटो समोर आला आहे. या प्रकरणी आठ टीम कडून आरोपीचा शोध सुरु आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रेय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे.या अगोदर दत्तात्रयवर शिरुर पोलिस स्थानकात चोरीचे, साखळी चोरल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार हा स्वारगेट स्थानकात वावरत होता. महाशिवरात्रीच्या सकाळी 5.30 वाजता ते 5.45 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दत्तात्रेयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचारसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीच्या मागावर पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे.
या घटनेनंतर त्या तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला.अत्याचारानंतर ती तरुणी बसमधून बाहेर पडली आणि दुसऱ्या बसमध्ये चढली. तिथून ती फलटणला आपल्या गावी गेली. तिकडे तिने आपल्या नातेवाईकांना आपल्यासोबत घडलेला सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबायांनी या प्रकाराची तक्रार पोलिसांत दाखल केली.
नेमकं काय घडलं?
पुण्याहून फलटणला जाण्यासाठी तरुणी स्वारगेट बस डेपोत आली होती. या पीडित तरुणीने आरोपीला फलटणला जाणाऱ्या बसबाबत विचारणा केली. याच प्रश्नाने पीडितेचा घात केला. आरोपी दत्तात्रय गाडेने याचाच फायदा घेतला. आरोपीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये घेवून गेला.
बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे आणि त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.