सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात अघोषित पाणीकपात,विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
 जिल्हा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    08-03-2025 12:37:18

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शुभेच्छा देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्माशताब्दी वर्षानिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मांडला. यावर मुख्यमंत्री फडणवीस  यांनी महिला सन्मान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय संस्कृतीत माता आणि मातृभूमीला अधिक महत्त्व दिले आहे. संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार देऊन समानता दिली आहे. भारत हा मातृभावनेने भरलेला देश आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, जिजाऊमाता, राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रियांमुळे महाराष्ट्राचा इतिहास समृद्ध झाला. नद्यांना सुद्धा आपण मातेसमान मानतो ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारच नव्हे, तर सामाजिक सुधारणा, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि लोककल्याणकारी योजना यावरही भर दिला. त्यांच्या कार्यपद्धतीत शाश्वत विकासाची तत्त्वे होती ती आजही मार्गदर्शक आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या काळात प्रभावी प्रशासन राबवले. त्यांनी आधुनिक पद्धतीचा स्वीकार करून उत्तम व्यवस्थापन केले. महेश्वरमध्ये अहिल्यादेवींनी आदर्श प्रशासन उभारून सुशासनाचा नवा अध्याय सुरू केला. त्यांनी जगभरातील कलाकारांना त्या ठिकाणी बोलावून राज्यातील कला आणि संस्कृतीला मोठा वाव दिला. त्यांनी स्थापत्यशास्त्राचा उपयोग करून अनेक शहरे वसवली आणि सुंदर मंदिरे, घाट, जलस्रोत विकसित केले. कलावंतांना  प्रोत्साहन दिले. त्याच्यांकडे व्यवस्थापन कौशल्य आणि आधुनिक दृष्टिकोन होता.

अहिल्यादेवी होळकर यांनी श्रद्धास्थानाचा जीर्णोद्धार केला. भारतभर अनेक मंदिरे पुन्हा बांधली, जीर्णोद्धार केला अन्नछत्र आणि धर्मशाळां निर्माण केल्या. पर्यावरण संवर्धन आणि प्राणीमात्रांबद्दलच्या संवेदनशील होत्या. मानवतेसाठीच नव्हे, तर प्राणी आणि पर्यावरण संवर्धनासाठीही मोठे कार्य केले. प्रभावी जलसंधारण व्यवस्था निर्माण केली. त्यांनी पार, जलकुंड, विहिरी, तलाव आणि जलसाठ्यांची निर्मिती केली. राज्य शासनाने सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ योजना देखील त्यांच्या जलसंवर्धन तत्त्वांवर आधारित आहे म्हणता येईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतात एक आदर्श प्रशासनिक पद्धती निर्माण केली. न्यायदान करताना त्यांनी निष्पक्षपणे निर्णय घेतले आणि गरिबांना संरक्षण दिले.अहिल्यादेवी होळकर यांचे आयुष्य संवेदनशीलता, शौर्य, प्रशासनिक कौशल्य आणि समाजहिताच्या कार्याने समृद्ध होते. त्यांच्यात नम्रता आणि कणखरपणा यांचा योग्य समतोल होता. त्यांच्या काळात प्राण्यांच्या देखभालीसाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.

भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासारख्या साहित्यिकांनी लोकपरंपरा जिवंत ठेवली. डॉ. प्रतिभाताई पाटील  देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या. भारतीय नौदलात अनामिका राजीव यांना नेतृत्व मिळाल, सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्षा झाल्या. असे सांगून महिलांबद्दलचा आदर, प्रतिष्ठा आणि समानता ही मूल्ये नवीन पिढीला शिकवली पाहिजेत. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर या केवळ एक सशक्त प्रशासक नव्हत्या, तर त्या धर्मपरायण आणि समाजहितैषी होत्या. महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतीबरोबरच त्या उद्योजक बनतील याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे सांगून राज्यभरातील महिलांना  त्यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती