उरण : "आगामी काळात उरण मतदारसंघातून डाॅ. मनीष पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत जसखार येथे म्हणाले.शुक्रवारी (ता. ७ )रात्री जसखार येथे 'काँग्रेस चषका'चे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महेंद्रशेठ घरत पुढेे म्हणाले,"प्रत्येकाच्या हाताला काम मिळालेच पाहिजे, दोन पैसे असतील तरच समाजात आपल्याला किंमत आहे. त्यामुळे कौटुंबिक आयुष्यही चांगले जगता येईल. त्यामुळे खेळाची आवड जोपासावी, पण प्रत्येक तरुणाने सर्वप्रथम पोटापाण्याचा विचार करावा. दरवर्षी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मी २०० ते ३०० तरुणांना नोकरी देतोय. "'काँग्रेस चषका'चे उत्तम आयोजन केले आहे, याबद्दल आयोजकांचे मनापासून अभिनंदन!
राजकारण फक्त निवडणुकीपुरते करा, विकासकामांत सर्वांनी राजकीय चपला बाहेर ठेवा, तेव्हाच आपल्या परिसराचा चांगला विकास होईल, असेही कार्यकर्त्यांना काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आवाहन केले.रत्नेश्वरी देवी मंदिरासमोरील मैदानावर काँग्रेस कमिटी जसखार, आर. पी. क्लब जसखारतर्फे मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जसखारच्या सरपंच काशीबाई ठाकूर, माजी सरपंच रमाकांत म्हात्रे, हेमंत ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मार्तंड नाखवा, डाॅ. मनीष पाटील, विनोद म्हात्रे, दीपक ठाकूर, रविकांत ठाकूर, संजय ठाकूर,संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, आदित्य घरत, निर्मलाताई पाटील, सुनील ठाकूर, प्रमोद म्हात्रे, जयवंत पाटील, कृष्णा कडू, सुरेश म्हात्रे आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व क्रीडारसिक उपस्थित होते.