मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरूण देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ३१.३३ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.
प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणाली बंधनकारक – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
राज्यातील शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होण्यासाठी १ जानेवारी २०२५ पासून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये देखील ही प्रणाली लागू केली जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली.विधानसभा सदस्य मोहन मते, संतोष बांगर यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री गोरे म्हणाले, ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी संगणक, इंटरनेट जोडणी, अखंडित वीजपुरवठा आणि संबंधित कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामस्तरापर्यंतही ही प्रणाली लवकरच कार्यान्वित केली जाईल. आत्तापर्यंत ई-ऑफिस प्रणालीद्वारे ३ लाख ५५ हजार पेक्षा अधिक फाईली तयार करण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभागांतर्गत ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरही लवकरच ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल, असे मंत्री गोरे यांनी विधानसभेत सांगितले.
भिवंडीतील माता आणि बाल रुग्णालयाच्या बांधकामास गती देणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
भिवंडी येथे माता आणि बाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देऊन या कामाला अधिक गती देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.विधानसभा सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भिवंडी येथे माता आणि बाल रुग्णालयाच्या नव्या विंगचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पावसाळ्याच्या अडथळ्यांमुळे काम थांबले होते. या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथक प्रत्यक्ष पाहणी करेल. पाहणीनंतर एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात येतील. प्राप्त अहवालानुसार या कामाला अधिक गती देऊन भिवंडी परिसरात अत्याधुनिक आणि सुसज्ज रुग्णालय उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. जेणेकरून स्थानिक नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असे मंत्री आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.