पुणे : पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राबाबतची माहिती देण्यासाठी महापालिकेने ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ ही सेवा सुरु केली असून आज पर्यंत २ हजार ३१८ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. मतदान केंद्र, बदललेले मतदान केंद्र, नावातील बदल यासाठी मतदारांनी महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ किंवा ०२०-६७३३९९९९ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
बुधवारी (दि.२० नोव्हेंबर) मतदानाच्या दिवशी महापालिकेच्यावतीने शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी या कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन अथवा सारथी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी.
मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांकडे मतदार ओळखपत्रावरील (इपिक) क्रमांक समक्ष अथवा दूरध्वनी वरुन सांगून मतदार यादीत संबंधीत मतदाराचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे शोधणे सुलभ जाईल. मतदार ओळखपत्र अथवा इपिक नंबर उपलब्ध नसल्यास नाव, वय, जन्मतारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन मतदान केंद्र शोधता येईल. मतदाराच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असल्यास मतदाराला आपले नाव मोबाईलवर ॲपद्वारे शोधणे सहज शक्य होणार आहे.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत सर्व मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.