पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारूवाला यांना 'वन इंडिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संघ प्रचारक आणि भाजप नेते सुनील देवधर यांनी स्थापन केलेल्या 'माय होम इंडिया' संस्थेच्या वतीने विले पार्ले येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल पी. सी. राधाकृष्णन आणि भाजपा नेत्या माधवी लता यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास, एकात्मता आणि राष्ट्र बांधणीसंबंधीच्या योजना अल्पसंख्याक समुदायांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सुनील देवधर यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना अली दारूवाला म्हणाले, *"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे राष्ट्रहिताची असून देशाला जागतिक स्तरावर पुढे नेणारी आहेत. या कार्यात आम्ही आमचे योगदान देत राहू. राष्ट्रीय मुख्य प्रवाहात अल्पसंख्याक समुदाय सामील झाल्यास राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल."*
अली दारूवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (नवी दिल्ली) आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. अलीकडेच त्यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग (नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज) चे राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच, ते पुण्यातील पी. ए. इनामदार विद्यापीठाचे सीनेट सदस्य देखील आहेत.