पिंपरी : सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एकावर खुनाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. २२) काळेवाडी येथे घडली. दरम्यान, शहरातील एका बड्या नेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळले. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तात्काळ बेड्या ठोकण्याचे आदेश दिले. तसेच, राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या पीएसआयचे तडकाफडकी निलंबन देखील केले.
आरोपी प्रशांत दिघे हा पिंपरी- चिंचवड शहरातील एक कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यांसारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि. २२) रात्री काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये आरोपीने एका व्यक्तीचा खुन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे पीएसआय सचिन चव्हाण यांनी त्याचे नाव गुन्ह्यातून वगळले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागत
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत चव्हाण यांना निलंबित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला न जुमानता कठोर पावले उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.