पुणे : 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून बाबुरावजी घोलप साहेब यांनी ७ सप्टेंबर १९४१ रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी खेड्यापाड्यात शाळा सुरू केल्या. या कामात त्यांना श्रीमती शारदाबाई पवार, अण्णासाहेब आवटे, शंकरराव भेलके, मामासाहेब मोहोळ यांनी सहकार्य केले. पुढे प्रा. रामकृष्ण मोरे यांनी संस्थेचा विस्तार केला आणि आज विद्यमान अध्यक्ष मा. ना. अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची सर्वांगीन प्रगती होत आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात शैक्षणिक प्रगती सोबतच खेळ आणि व्यायामाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांना लहानपणापासून खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने गेल्या नऊ वर्षांपासून या क्रीडामहोत्सवाचे आयोजन केले जाते. यापूर्वी या स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे होत होत्या. परंतु गेल्या वर्षापासून सदर जिल्हास्तरीय स्पर्धा या सासवड व खराडी या ठिकाणी घेण्यात येत आहेत. त्यानुसार याही वर्षी दि. २८ ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी या स्पर्धेचे आयोजन खराडी व सासवड या ठिकाणी केले आहे. विविध स्पर्धांमध्ये संस्थेच्या विविध शाखांतील ३६५० खेळाडू सहभागी होणार आहेत.
यावर्षी होत असलेल्या स्पर्धेसाठी संस्थेतील विविध विद्यालयांचे वाघोली, खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव केतकी, सुपे, नसरापूर, न्हावरे असे नऊ गट तयार करण्यात आले. नऊ गटांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, या सांघिक तर कुस्ती, बुद्धिबळ, कराटे, तायक्वांदो योगासने, अॅथलेटिक्स या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे १५००० खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यातील प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी जिल्हापातळीसाठी खेळणार आहेत. त्यातील बुद्धिबळ, कुस्ती, कराटे, तायक्वांदो, योगासने या जिल्हापातळीवरील स्पर्धा २८ डिसेंबर २०२४ रोजी खराडी येथे पार पडणार असून उर्वरीत स्पर्धा ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे होणार आहे.
सदरील स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी व उत्तेजन मिळत आहे व त्यामुळे आपल्या अनेक विद्यार्थ्यांची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून विद्यार्थ्यांमधील क्रीडावृत्तीस चालना मिळाली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विशेषतः क्रीडा गुणांना वाव मिळाला असून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या क्रीडा स्पर्धांचे फलित म्हणून संस्थेच्या विविध शाखंतील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावलौकीक वाढविला आहे. संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सन २०१२-१३ ते २०२३-२४ अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवर ७०, राष्ट्रीय पातळीवर ४४४, राज्य पातळीवर ७३६, अशा एकूण १२५० खेळाडूंची निवड झालेली असून त्यापैकी आंतरराष्ट्रीय पातळीवर ४८, राष्ट्रीय पातळीवर २४०, राज्य पातळीवर ५२० अशी एकूण ८६८ पदके विविध खेळाडूंना प्राप्त झाली आहेत. श्रीलंका, मास्को, सिंगापूर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, बँकॉक, थायलंड, भूतान देशात झालेल्या स्पर्धेत संस्थेच्या विद्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये खालील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष प्रावीण्य मिळविले आहे.
१) 'कु. अवंतिका नरळे', मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौडरोड या विद्यार्थिनीने २०१९ साली राष्ट्रीय पातळीवर झालेल्या क्रीडा स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर
धावणे व ४ x १०० मीटर रिले या तीनही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून तिने एकूण तीन सुवर्ण पदके प्राप्त केलेली असून शालेय स्पर्धेत तीन सुवर्णपदके प्राप्त करणारी देशात ती एकमेव खेळाडू ठरली आहे. त्याचवर्षी हाँगकाँगला झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रजत पदक मिळविले. खेलो इंडिया खेलो २०१९ या स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुलींमध्ये ४ × १०० रिलेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले असून त्याच स्पर्धेत २०० मीटर धावण्यातही सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेत तिने स्वतःचेच पूर्वीचे शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील २४.६० सेकंद हे रेकॉर्ड मोडून तिने २४.४७ सेकंद हे नवीन रेकॉर्ड केले. चीन येथे झालेल्या जागतिक आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेत भारतीय संघात निवड होऊन स्पर्धेत ६ वा क्रमांक मिळाला. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स १०० व २०० मी. सिल्व्हर मेडल प्राप्त. आंतरराष्ट्रीय ज्यु. अॅथलेटिक्स स्पर्धेत निवड तसेच सन २०२३-२४ खेलो इंडिया स्पर्धेत १०० मी. सुवर्णपदक प्राप्त.
२) देवेंद्र सुर्वे - बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी या विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२१-२२ चा कनोईंग व कयाकिंग या खेळात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला. सांगली येथे झालेल्या राष्ट्रीय कयाकिंग स्पर्धेत त्याने सुवर्णपदक प्राप्त केले.
३) ऋत्विक मारणे अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट या विद्यार्थ्याला स्पोर्टस लायबिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२१-२२ चा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त झाला. बेंगलोर येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रस्त रोहन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
४) अबु तांबोळी - अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन (२६/१/२०२४) परेड संचलनासाठी निवड
५) तुषार अडसूळ अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन (२६/१/२०२४) परेड संचलनासाठी निवड
६) साक्षी वर्मा - प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन (२६/१/२०२४) परेड संचलनासाठी निवड
७) वीणा भोसले प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन (२६/१/२०२४) परेड संचलनासाठी निवड
८) अनुष्का साठे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन (२६/१/२०२४) परेड संचलनासाठी निवड
९) वैभव कामठे – वाघिरे महाविद्यालय, सासवड राजपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन (२६/१/२०२४) परेड संचलनासाठी निवड
गेल्या नऊ वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मा.ना. अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा' सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात येते. सदर सायकल स्पर्धेत १३ राज्यांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धक सहभागी होतात. या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य वर्धन, बेटी बचाओ, स्वच्छता, वाहतूक व प्रदूषण, पाणी वाचवा इ. उपक्रमातून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रूपये पाच लाखांपर्यंत बक्षिसे, ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात येतात. खेळाडूंच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून खेळाडू दत्तक योजना, खेळाडूंना प्रवेशामध्ये आर्थिक सवलत तसेच संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात रोख स्वरूपात बक्षिसे दिली जातात.
मा. अध्यक्ष साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दर महिन्याच्या २२ तारखेला सर्व शाखांमधून प्लास्टीक संकलन केले जाते. प्लास्टीक संकलन करून ते रिसायकलिंगकरिता देण्यात येते. आजपर्यंत ५ टनापेक्षा अधिक प्लास्टिक संकलन करून ते रिसायकलिंगसाठी देण्यात आलेले आहे. तसेच शाळा, परिसर, गावामध्ये प्लॅस्टीकचा वापर कमीत कमी कसा होईल यासाठी जनजागृती, प्रभात फेरी इ. उपक्रम राबविले जातात. उत्तरपत्रिकांमधील राहिलेल्या कोऱ्या कागदांपासून पुन्हा नव्याने २७०० वहया तयार करून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या आहेत.
संस्थेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी विविध शैक्षणिक, क्रीडा उपक्रम राबविले जातात. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास व्हावा यासाठी इंग्रजीतील संभाषण कौशल्य वाढण्यासाठी संस्थेने "कॉग्निटिव्ह एस्चेंज", कॅलिफोर्निया अमेरिकास्थित एन. जी. ओ. संस्थेशी सामंजस्य करार केला असून या संस्थेच्या माध्यमातून २६ शाखांमधून बेसिक व अॅडव्हान्स मोडयुल्सचे प्रशिक्षण दिले जाते.
प्राथमिक व माध्यमिक स्तरावर “शिक्षक पालक विद्यार्थी दत्तक" हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतो. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी "आविष्कार गुणवर्धन कार्यक्रम" राबविल्यामुळे इ. १० वी व इ. १२ वीचे निकाल जिल्हा, पुणे विभाग व राज्याच्या निकालापेक्षा जास्त लागलेले आहेत. इ.१२ वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची MHCET, JEE, NEET या राज्य व राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी होण्यासाठी 'ब्रिलीयंटा स्कॉलर बॅच" ही योजना सुरू केली आहे.
विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य व महाविद्यालयांचा दर्जा वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध संस्था यांचेकडून भरीव अनुदान प्राप्त झाले असून त्यातून महाविद्यालयांचा विकास होत आहे. विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने विविध महाविद्यालयांमध्ये कौशल्य आधारित "बी. व्होक" कोर्सेसचे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थी, अध्यापक यांचेसाठी रिसर्च सेंटर्स सुरू करण्यात आलेली आहेत. या सर्व उपक्रमांचे फलित म्हणजे संस्थेच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी या महाविद्यालयास A++ (Autonomous), अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर या महाविद्यालयास A+ श्रेणी प्राप्त झाली, तर पिरंगुट, ओतूर व सासवड येथील फार्मसी महाविद्यालयास A श्रेणी प्राप्त झाली. मांजरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, खराडी येथील फार्मसी महाविद्यालय व सासवड येथील वाघीरे महाविद्यालयास B++ तसेच सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व पौडरोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयास B+ श्रेणी प्राप्त झाली आहे. इतर सर्व महाविद्यालयांस B श्रेणी प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये निती आयोगामार्फत संस्थेच्या पाच शाखांमधून "अटल टिंकरिंग लॅब" सुरू करण्यात आलेल्या आहेत.
या क्रीडा स्पर्धाचा उद्घाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मा.ना. अजितदादा पवार साहेब-उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली व मा. दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.सौ. सुनेत्राताई पवार, खासदार, मा.डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सोमवार, दि. ३०/१२/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वा. वाघीरे महाविद्यालय, सासवड, ता. पुरंदर या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच सदर कार्यक्रमास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी अर्जुन पुरस्कार विजेते, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते, तसेच क्रीडा क्षेत्रातील नामवंत मान्यवरही उपस्थित राहणार असून कला व संस्कृती या क्षेत्रातील नामवंत अभिनेते व अभिनेत्री सुध्दा उपस्थित राहणार आहेत.
सेवकांचा विकास व आर्थिक सबलतेसाठी सुरू केलेल्या सेवक सहकारी पतसंस्था, सेवक कल्याण निधी, सेवक सहकारी प्राथमिक ग्राहक संस्था ही संस्थेची अन्य उपांगे आर्थिकदृष्टया अधिक सक्षम होत आहेत. सेवक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी शाखा व संस्था स्तरावर विविध पारितोषिके दिली जातात.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मा. ना. अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. अॅड. संदीप कदम, खजिनदार मा. अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल. एम. पवार, सहसचिव मा. ए. एम. जाधव, सर्व प्राचार्य, सर्व शाखाप्रमुख, क्रीडा शिक्षक व संस्था मुख्य कार्यालयातील स्टाफ यांच्या अथक परिश्रमातून या क्रीडा स्पर्धा साकार होणार असून यातूनच भारताचे भावी ऑलिम्पिक विजेते घडतील असा विश्वास आहे.