सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

रासेयो शिबिरामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास मदत: डॉ. सदानंद भोसले

डिजिटल पुणे    30-12-2024 11:01:37

पुणे : महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सूरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आज देशभरातील लाखो विद्यार्थी हे ग्रामीण जीवन व संस्कृतीशी जोडले गेले आहेत. विशेषतः दरवर्षी आयोजित होणाऱ्या रासेयो विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन, देशप्रेम, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी हे गुण निर्माण होत असून याद्वारे राष्ट्रीय एकात्मता वाढीस मदत होत आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या मुळशी तालुक्यातील मौजे चांदे येथे सुरू असलेल्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. मनीषा शेवाळे, डॉ. प्रवीण चोळके, डॉ. मेधा मिसार यांची विशेष उपस्थिती होती.
 
बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबीर २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये मौजे चांदे येथे पार पडत असून या शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवक गावामध्ये  डिजिटल लिटरसी, ग्रामस्वच्छता, प्लास्टिक संकलन, महिला सबलीकरण, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती, कोल्हापूरी बंधारा, सलग सम पातळी चर असे विविध उपक्रम राबवत असून पथनाट्याद्वारे विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करत आहेत. यावेळी डॉ. सदानंद भोसले यांनी या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये होत असलेले बदल जाणून घेत राष्ट्र विकासासाठी तरूणाईचे योगदान यांवर संवाद साधला.
 
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी रासेयो शिबिरामध्ये ग्राम विकास पर्यायाने स्वतःच्या व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यार्थी करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना शाबासकीची थाप दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सद्दाम घाटवाले तर आभार प्रदर्शन डॉ. नागेश भंडारी यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ. विजय बालघरे, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. ऋषिकेश हिवाळे, प्रा. प्रवीण खाडे, प्रा. काजल कांबळे, प्रा. दिपाली शिंदे, निलेश शिंदे, सचिन शितोळे यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती