पुणे : अलीकडच्या काळात वाचनापासून दुरावत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्याद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि कार्यपद्धती देण्यात आली आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक वाचायचे आहे. या पुस्तकावर किमान ५०० शब्दांचे परीक्षण किंवा पाच मिनिटांचे सादरीकरण करायचे आहे. वाचनीय पुस्तकांची यादी प्रसिद्ध करून उच्च शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यायची आहेत. स्पर्धेतील विजेत्या परीक्षणांचा समावेश महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात करावा. स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी पारितोषिक प्रदान करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंबंधी शासनाने तर सूचना केली आहेच परंतु जयकर ग्रंथालय, (जयकर ज्ञानास्त्रोत केंद्र) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे संचालक डॉ.संजय देसले यांनीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित सर्व ग्रंथपाल यांना सोबत घेऊन वाचनासाठी तसेच वाचन वाढविण्याच्या उद्देशाने पुस्तक परीक्षण एकत्रित पोर्टल (bklibrary.unipune.ac.in) तयार करण्याचा मानस ग्रंथपालांनच्या ऑनलाईन सभेत बोलून दाखवला आहे. त्यासाठी ग्रंथपालांनच्या समित्या स्थापन केल्या जात आहेत.
जयकर ज्ञानास्त्रोत केंद्रचे संचालक डॉ.देसले यांनी सांगितले आहे की ग्रंथपाल हा महाविद्यालयाचा महत्त्वाचा घटक असून वाचनसंस्कृती रुजवण्यात् तसेच वृद्धिंगत करण्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे. "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा कार्यक्रम ग्रंथपालांना आपला ठसा उमटवन्यासाठी मोठी संधी आहे.
इंटरनेट च्या युगात विद्यार्थ्यांच्या मनात हा भ्रम निर्माण झाला आहे की इंटरनेट वर सर्व माहिती उपलब्ध आहे. आपण त्यांना हे सांगणे गरजेचे आहे की इंटरनेट वरची सर्वच माहिती खरी नसते आणि महत्त्वाची माहिती उपलब्ध नसते उदा. पुस्तके,शोधनिबंध प्रसारित करणारे नियतकालिके, डेटाबेस ह्यासाठी ग्रंथालयांना मोठ्या वर्गण्या भराव्या लागतात. हि माहिती तुम्हाला ग्रंथालयातच बघायला मिळेल. इंटरनेट वर आपण फक्त आपल्याला माहीत असलेल्या विषयाचीच माहिती शोधू शकतो त्याउलट ग्रंथालयात नवीन पुस्तके, नवीन माहिती नजरेत पडते म्हणून ग्रंथालयातून नवीन कल्पना उदयास येतात. त्यामुळे "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमाअंतगत पुस्तकांचे व ग्रंथालयांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
ह्या सभेसाठी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन ग्रंथपाल उपस्थित होते. डॉ.योगेश मते यांनी आपल्या प्रस्तावनेत ग्रंथपालांनी एकत्र येऊन कोरोना काळात विकसित केलेल्या ई- कंटेंट पोर्टल तसेच नुकत्याच झालेल्या ग्रीनिज बुक रेकॉर्ड मध्ये ग्रंथपाल यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आठवण करून दिली. तशाच प्रकारचे योगदान "पुस्तक परिक्षण पोर्टल" साठी द्यावे असे आवाहन केले. यावेळी डॉ. प्रदीप बच्छाव यांनी तयार करण्यात आलेल्या (bklibrary.unipune.ac.in) पोर्टल बद्दल अधिक माहिती दिली.