पुणे: येथील सुजॉय बिल्डकॉन प्रा. लि. या पायाभूत सुविधा उभारणी,बांधकाम क्षेत्रात कार्यरत कंपनीने अहमदाबाद, गुजरात येथील साणंद मध्ये 'केईआय वायर अँड केबल्स' कंपनी साठी व्हीसीव्ही टॉवर पाइल कॅप राफ्ट प्रकल्पात सतत काँक्रीट ओतकामाचा सर्वात मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. हे भव्य ओतकाम, ज्याचे मोजमाप 8700 घनमीटर होते, 27 डिसेंबर 2024 रोजी सायं. 5:30 वाजता पूर्ण झाले. हा विक्रम 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' चे श्री. रितेश हर्षद यांनी प्रमाणित केला आणि नोंद झाला आहे.
ही कामगिरी सुजॉय बिल्डकॉनच्या बांधकामाच्या उच्च दर्जाची बांधिलकी आणि दर्जेदार प्रकल्प साकारण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. 158 मीटर उंचीचा आणि 4.5 मीटर खोल पाइल कॅप फाउंडेशन असलेला व्हीसीव्ही टॉवर हा अभियांत्रिकी कौशल्य आणि नवकल्पनेचा उत्कृष्ट नमुना आहे. हा विक्रम अभूतपूर्व कर्तृत्वाचे प्रदर्शन असून, अद्वितीय संघटीत कामामुळे हे शक्य झाले आहे.
"आम्हाला ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केल्याचा अभिमान आहे. ही कामगिरी आमच्या संपूर्ण संघाच्या अद्वितीय कौशल्याचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा पुरावा आहे. आम्ही दर्जा, सुरक्षा आणि नवकल्पनेचे उच्चतम मापदंड गाठण्यासाठी कटिबद्ध आहोत," अशी प्रतिक्रिया सुजॉय बिल्डकॉन प्रा. लि. चे संचालक सोपान खेडेकर यांनी व्यक्त केली.
ही कामगिरी सुजॉय बिल्डकॉनला बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून अधोरेखित करते, मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रकल्पांना अचूकतेने व कार्यक्षमतेने पूर्ण करण्याच्या क्षमतेचे प्रतिक बनली आहे.सुजॉय बिल्डकॉन ने सहकार्याबद्दल केईआय वायर अँड केबल्स, जेएलएल, आयपीएस मेहतालिया कन्सल्टंट्स, आरएमसी विक्रेत्यांसह सर्व संबंधित भागीदारांचे आभार मानले आहे.