पुणे- लहान मुलं असो किंवा कोणीही, अनेक भाज्यांनी नटलेला पिझ्झा कोणालाही आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. मात्र, हा पिझ्झा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळं जर तुम्ही पिझ्झा खात असाल तर सावध व्हा. कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. काल रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, सुरुवातीला त्यांना डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलीत. मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्यालादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झाकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आलेत. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झाविरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न आणि औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत.
इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी काल रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज पिझ्झामधून 596 रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच्या तुटलेला तुकडा घुसला होता. अरुण कापसे यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचे सांगितले. त्यांनी लगेच डोमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.