पुणे :- दाऊदी बोहरा समाजातर्फे आयोजित सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो २०२५ चे पुण्यातील डेक्कन काॅलेज ग्राऊंड वर शनिवार ४ जानेवारीला शानदार उद्घाटन संपन्न झाले। दाऊदी बोहरा समाजाचे परमपुज्य सैयदना मुफद्दल सैफुद्दीन साहब यांचे चिरंजीव हुसैन बुऱ्हानुद्दीन यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या उद्घाटन समारोहाला किर्लोस्कर न्यूमेटिक्सचे चेअरमन राहुल किर्लोस्कर, आयकर आयुक्त डाॅ. नितिन वाघमोडे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख उमेश शाह यांच्यासह मोठ्या संख्येने दाऊदी बोहरा समाजाचे उद्योगपती-व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना एक-दुसऱ्यांसोबत कनेक्ट करण्याच्या उद्देशाने या बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उद्घाटन सत्रापूर्वी पुण्याच्या दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने फत्तेचंद रांका आणि उमेश शाह यांना सन्मानित करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी एक्स्पोची पाहणी केली आणि विविध स्टाॅल्सना भेटी देऊन त्यांच्या व्यवसायांची माहिती घेतली.
सोमवार ६ पर्यंत चालणाऱ्या या बिझनेस एक्स्पोमध्ये पुणे आणि महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील तसेच विदेशातून आलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांचे स्टाॅल्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये एमएसएमईज, स्टार्टअप्स, वुमेन आंत्रप्रेन्योर, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, एज्युकेशनल इन्स्टीट्यूट्स, हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोफेशनल्स यांचे १७० स्टाॅल्स आहेत।
पहिल्याच दिवशी बोहरा समाजाच्या नागरिकांसह सर्वसामान्य पुणेकरांनी भेट देणे सुरू केले. येथे आल्यानंतर नागरिकांनी विविध स्टाॅल्सवर जाऊन विविध वस्तूंची माहिती घेतली यामध्ये फर्निचर, हार्डवेअर, गृह सजावटीच्या वस्तूंची खरेदीदेखील केली. एक्स्पोसंदर्भात दाऊदी बोहरा समाजाच्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
हरित आणि प्रदूषणमुक्त पुणे करण्याच्या उद्देशाने एक्स्पोच्या आयोजकांकडून या एक्स्पोला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वृक्ष भेट देण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
बिझनेस एक्स्पो संदर्भात बोलताना फत्तेचंद रांका म्हणाले की, दाऊदी बोहरा समाज हा नेहमीच उद्योग-व्यापारात अग्रगण्य राहिला आहे. या बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून या समाजाची उद्यमशीलता आणखीनच चांगल्याप्रकारे समोर आली आहे. हा एक्स्पो विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देणारा आहे. या एक्स्पोमध्ये देशभरातील विविध मॅन्यूफॅक्चरर्सचे आणि वस्तूंचे स्टाॅल्स लागलेले आहेत. याचा फायदा रिटेलर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने या एक्स्पोला पूर्ण सहकार्य देण्यात आलेले आहे.
उमेश शहा म्हणाले की, सैफी बुरहानी एक्स्पो हा दाऊदी बोहरा समाजाचा एक अनोखा व्यावसायिक उपक्रम आहे. दाऊदी बोहरा समाजाने या माध्यमातून आपल्या व्यावसायिक कार्याला एका उंचीवर नेण्याचे कार्य केले आहे. या एक्स्पोमधून पुण्याच्या व्यापार-उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी या एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.