पुणे: ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए) तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी (संस्थापक,व्हीके ग्रुप) आणि ज्येष्ठ अभियंता जयंत इनामदार(संस्थापक,स्टर्डकॉम कन्सल्टंट्स) यांना जाहीर झाला आहे.आर. बी. सुर्यवंशी (उपाध्यक्ष व संचालक मंडळ सदस्य, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. स्मिता पाटील (अध्यक्ष, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल) उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम शुक्रवार, १० जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, रॉयल हॉल, गार्डन कोर्ट, एनडीए रस्ता येथे आयोजित केला आहे.या वार्षिक पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे.
‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए) चे प्रेसिडेंट आर्किटेक्ट राजीव राजे, उपाध्यक्ष आर्किटेक्ट संजय तासगांवकर, चेअरमन आर्किटेक्ट महेश बांंगड आणि सचिव आर्किटेक्ट निनाद जोग यांनी ही माहिती दिली. 'सॉलिटेअर ग्रुप' च्या सहकार्याने हा सोहळा होत आहे.हा पुरस्कार सोहळा १८ व्या वर्षात पदार्पण करत असून, पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि विशेष प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (एईएसए) दरवर्षी एका ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एका ज्येष्ठ अभियंत्याचा त्यांच्या क्षेत्रातील तसेच विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करते.
५४ वर्षांचे गौरवशाली योगदान
पुण्यातील ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (AESA) ची स्थापना १९७० साली झाली. बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी हातभार लावावा, या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. स्वयंसेवी आणि ना-नफा तत्त्वावर आधारित ही संस्था आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्ससाठी उत्कृष्ट व नैतिक कार्यपद्धतीला प्रोत्साहन देत असून, पुणे शहराच्या सामाजिक व नागरी प्रश्नांमध्ये सक्रीय सहभाग घेत आहे.संस्थेच्या उपक्रमांचे आयोजन मुख्यतः सदस्यांच्या वर्गणीतून आणि उदार देणगीदारांकडून मिळणाऱ्या प्रायोजकत्वातून केले जाते. शहराच्या कल्याणासाठी उत्पादक, वितरक आणि औद्योगिक संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या मदतीतून हे उपक्रम राबवले जातात.