पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने नाविन्यपूर्ण प्रकल्प कल्पना मांडणाऱ्या प्रकल्प व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.भारती विद्यापीठचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि भारती विद्यापीठचे कार्यवाह तसेच भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.९ जानेवारी २०२५ रोजी कमिन्स इंडियाचे संचालक महेश माने यांनी केले.
या प्रसंगी सी-डॅक (पुणे)चे सहसंचालक गौर सुंदर,भारती विद्यापीठचे सहकार्यवाह डॉ.के.डी. जाधव,अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्राचार्या डॉ.सुनीता जाधव, उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाण,डॉ. अतुल आयारे,डॉ. सुहास पाटील,डॉ. मिलिंद गायकवाड इत्यादी उपस्थित होते.या प्रदर्शनात १२० पेक्षा अधिक प्रकल्प आणि ८० हून अधिक पोस्टर कल्पना मांडण्यात आल्या होत्या, ज्यात विविध तांत्रिक क्षेत्रे तसेच सामाजिक आणि औद्योगिक उपयोगांसाठीची कामे सादर करण्यात आली होती.डॉ. सचिन चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले. डॉ. मिलिंद गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.डॉ. राजेश प्रसाद यांनी महाविद्यालयाच्या उल्लेखनीय रँकिंग्स, पुरस्कार आणि यशांविषयी उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याचे प्रदर्शन करणाऱ्या या प्रकल्प प्रदर्शनाचे महत्त्वही अधोरेखित केले.
महेश माने आपल्या भाषणात म्हणाले,"स्थानिक नवोन्मेष-जागतिक प्रभाव या सूत्रातून भारताचे भविष्य सशक्त बनविणे हे उद्दिष्ठ असले पाहिजे.जागतिक संकटे जसे की कोविड, भू-राजकीय संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडचणी असूनही, भारतात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. भारत स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एक महत्त्वाचा खेळाडू बनत आहे आणि "मेक इन इंडिया" सारख्या उपक्रमांमुळे स्थानिक उत्पादन व उद्योजकतेला चालना मिळत आहे'.
'कमिन्स सारख्या कंपन्या विविधता आणि समावेशाला प्रोत्साहन देऊन, शैक्षणिक संस्थांना पाठिंबा देऊन आणि नोकरी प्रशिक्षण प्रदान करून सामाजिक परिवर्तन घडवत आहेत. स्थानिक विकासाला पाठिंबा देणे म्हणजे भारतीय सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करणे. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य प्रत्यक्षात वापरावे यासाठी प्रोत्साहन दिल्यास नवकल्पना आणि आर्थिक विकासाला चालना मिळू शकते',असेही त्यांनी सांगितले.