सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ४ ॲागष्टला HDFC बॅकेचे UPI पेंमेंट बंद
 शहर

पुण्यात जीबीएसचे १११ रुग्ण, केंद्र सरकारनं पाठविलं ७ तज्ञांचं पथक

डिजिटल पुणे    28-01-2025 16:19:11

पुणे- पुण्यात गुलेन बारी सिंड्रोमचे (GBS) रुग्ण वाढत असल्यानं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सोमवारी सात सदस्यांचं पथक पुण्यात पाठविलं आहे. हे पथक जीबीएस नियंत्रणात आणण्याकरिता व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालायाच्या माहितीनुसार केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) दिल्ली, निमहंस बंगळुरू, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे प्रादेशिक कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), पुणे येथील सात तज्ञांचा समावेश आहे. पुण्यातील एनआयव्ही येथील तीन तज्ञदेखील जीबीएस नियंत्रणासाठी काम करत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील जीबीएसच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या संदर्भात राज्य सरकारशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत आहेत.

पुण्यात सोमवारी जीबीएसचे नऊ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जीबीएसच्या रुग्णांची पुण्यातील संख्या 111 वर पोहोचली आहे. यामध्ये 74 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माहितीनुसार 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहराच्या विविध भागातील 34 पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी सात नमुन्यांमध्ये पाणी दूषित असल्याचे आढळून आल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुण्यातील रुग्णालयांमध्ये जीबीएस रुग्णांचे प्रमाण

दिनानाथ रुग्णालय :- २६

ससून रुग्णालय :- २१

काशीबाई नवले रुग्णालय :- ९

सह्याद्री डेक्कन :- ७

पूना हॉस्पिटल :-५

भारती विद्यापीठ :- ४

वायसीएम :- ४

पल्स हॉस्पिटल :- ३

साईनाथ हॉस्पिटल :- ३

डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय :-२

ग्लोबल हॉस्पिटल :- २

श्रेयानस हॉस्पिटल :- २

पुण्यातील विविध भागातील इतर १३ रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण

वयोगटानुसार जीबीएस रुग्णांची संख्या

पुणे शहर आणि परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) च्या 111 > रुग्णांची नोंद झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव लहान मुले आणि तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. वयोगटानुसार रुग्णसंख्या: 0 ते 09 वर्षे: 19 रुग्ण, 10 ते 19 वर्षे: 15 रुग्ण, 20 ते 29 वर्षे: 20 रुग्ण, 30 ते 39 वर्षे: 13 रुग्ण, 40 ते 49 वर्षे: 12 रुग्ण, 50 ते 59 वर्षे: 12 रुग्ण, 60 ते 69 वर्षेः 8 रुग्ण, 70 वर्षांवरील: 1 रुग्ण आहे. गेल्या काही दिवसांपासून GBS रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

जीबीएस म्हणजे काय?- जीबीएस हा एक गंभीर आजार आहे. या आजारात रुग्ण काही दिवस अंथरुणाला खिळून राहतो. जीबीएसने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये विषाणू हे मेंदू आणि पाठीच्या कण्याबाहेरील निरोगी नसांवर हल्ला करतात. या आजारात कधी-कधी अर्धांगवायू होतो. जीबीएसच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे हा आजार पूर्णपणं बरा होणं शक्य आहे. जीबीएसचे त्वरित निदान आणि उपचार करणे महत्त्वाचं असते.

सोलापूर जिल्ह्यात जीबीएसच्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. या आजाराच्या उपचारांबद्दल रुग्णालयांकडून अवाजवी बिल येत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी खासगी वैद्यकीय सुविधांना त्यांच्याकडून जास्त शुल्क आकारू नये, असे निर्देश दिल्याचं सोमवारी पुण्यात माध्यमांशी सांगितलं.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती