पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर आणि चॉईस वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. "कला, सामाजिक विज्ञान, मानविकी आणि वाणिज्य मधील बहुविद्याशाखीय दृष्टीकोन" हा चर्चासत्राचा विषय असून चर्चासत्रासाठी उदघाटक म्हणून भारतीय शिक्षण संस्था, पुणे चे संचालक डॉ. अरुण अडसूळ हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि बीजभाषक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ सायन्सचे अधिष्ठाता डॉ. दिलीप देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्रासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा.राजेंद्र घाडगे हे अध्यक्ष असणार आहेत. प्लेनरी संवादामध्ये “मॉरल्स अँड एथिक्स इन एज्युकेशन “या विषयावर चर्चा करण्यासाठी डॉ. अरुण अडसूळ (भारतीय शिक्षण संस्था, पुणे चे संचालक) , प्रा.डॉ.विजय खरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास विभागाचे प्रमुख) ,प्रा.डॉ.सूर्यनारायनन (माजी अधिष्ठाता,व्यवस्थापन विद्याशाखा,उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद तेलंगणा) डॉ.आनंद कुलकर्णी (प्राचार्य, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बोर्ड ऑफ स्टडीज फॉर इंग्लिशचे अध्यक्ष) प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे, चॉईस वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य डॉ. अन्वर शेख, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व महाविद्यालयातील मा.प्राचार्य, सर्व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
या चर्चासत्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रामध्ये होऊ घातलेले बदल, त्याचे स्वरूप, भविष्यात होणारे परिणाम यावर चर्चा केली जाणार आहे. सदरचे चर्चासत्र हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने चालणार असून चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रबाहेरील शंभर पेक्षा जास्त संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थी, संशोधन समन्वयक, संशोधक, पी.एच.डी. संशोधक सहभागी होणार असून त्यांना स्वतःचा संशोधन पेपर सादर करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. जे सहभागी महाराष्ट्रबाहेरून येणार आहेत त्यांचेसाठी भारतीय शिक्षण संस्था, पुणे येथे निवासासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे.
चर्चासत्रामध्ये येणाऱ्या सर्व शोधनिबंधाचे प्रकाशन आय.एस.बी.एन.नंबर असलेल्या पुस्तकामध्ये करण्यात येणार आहे. चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी डॉ. नितीन घोरपडे (व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्राचार्य, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर) आणि डॉ.संगीता जगताप (प्राचार्य, बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगावी) हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चर्चासत्र संयोजक प्राचार्य डॉ.तुषार शितोळे, प्राचार्य डॉ.अन्वर शेख आणि चर्चासत्र समन्वयक डॉ. संगीता घोडके यांनी दिली.