सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

विनामूल्य अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा शिबीरास प्रतिसाद ; आयुर्वेदीक उपचार परंपरा पुढे न्यावी: डॉ.भूषण पटवर्धन

डिजिटल पुणे    04-02-2025 12:15:30

पुणे : कै.वैद्य रामचंद्र बल्लाळ गोगटे यांच्या जयंतीनिमित्त 'इंडियन ड्रग्स रिसर्च असोसिएशन अँड लॅबोरेटरी'च्या इंटिग्रेटीव्ह पेन मॅनेजमेंट क्लीनिककडून  व गोगटे फाउंडेशनच्या  संयुक्त विद्यमाने दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्धकर्म  चिकित्सा दिवस साजरा करण्यात आला.  गोगटे यांच्या जयंतीनिमित्त  मोफत अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा शिबिर सकाळी १०.३० ते  दुपारी १२.३० या वेळेत  आयोजित करण्यात आले .शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ' आयुष ' च्या   केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद चे ज्येष्ठ संशोधक प्रा.डॉ. भूषण पटवर्धन, वैद्य गोगटे यांचे चिरंजीव पद्मनाभ गोगटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी  'इंडियन ड्रग्स रिसर्च असोसिएशन अँड लॅबोरेटरी'चे अध्यक्ष डॉ.सुहास जोशी हे होते.डॉ.पूर्वा गोखले यांनी सूत्रसंचालन केले.फाऊंडेशनच्या वतीने डॉ.प्रज्ञा अक्कलकोटकर,डॉ.पूर्वा गोखले यांनी स्वागत केले.डॉ.मंदार अक्कलकोटकर यांनी प्रास्ताविक केले.डॉ.प्रज्ञा अक्कलकोटकर यांनी विद्धकर्माचे प्रात्यक्षिक दाखवले.
 
यावेळी बोलताना डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले,' गांजलेल्या रुग्णांना  दिलासा देणे, हे वैदयकीय व्यवसायाचे उद्दीष्ट असायला हवे. डॉक्टरांनी उपचार करताना सेवाभावी कामाने दिलासा द्यावा. आयुर्वेदिक ज्ञानाची परंपरा पुढे सुरु ठेवावी. योग हे प्रगत शास्त्र आहे.योग आणी आयुर्वेद ची जोड दिल्याशिवाय फिजिओथेरपी उपचार अपूर्ण ठरतात. कोश, चक्र अशा योगाच्या अनेक संकल्पनाचे पुरावे देता येत नसले तरी त्या अस्तित्वात नाहीत,असे म्हणता येणार नाही. जिवंत शरीराचा अभ्यास करून योग निर्माण झाला,हे विसरता येणार नाही'.
 
'वैद्य गोगटे,डॉ. घारपुरे यांनी वैद्यकीय व्यवसायाला नैतिकतेचे अधिष्ठान दिले. वैद्यकीय व्यवसाय धंदेवाईक होत असल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर असताना ही मूल्यव्यवस्था दिशादर्शक ठरेल. त्यातून रुग्णसेवेतून ईशसेवा व्हावी ', असेही ते म्हणाले.गोगटे यांच्या जयंतीनिमित्त  मोफत अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा शिबिरात शरीरातील विविध प्रकारच्या वेदना,सांधेदुखी, गुडघेदुखी,मणक्याचे विकार,टाचदुखी,पायाला झालेले कुरुप,मनोकायिक विकार अशा रुग्णांवर  मोफत रुग्ण तपासणी व उपचार करण्यात आले .हे शिबीर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र,डॉ.घारपुरे बंगला,हर्डीकर हॉस्पिटल जवळ (शिवाजीनगर) येथे पार पडले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती