पुणे: सिंहगड रस्त्यावरील फन टाईम सिनेमाजवळील अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान पथारी विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांचे तातडीने निलंबन करावे,अशी मागणी लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाने केली आहे.
लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ३ फेब्रुवारी रोजी हे निवेदन पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांना देण्यात आले.यावेळी जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी महासंघचे पुणे शहर कार्याध्यक्ष अख्तर खान, अब्दुल शेख,श्रावण कांबळे, स्वाती देशमुख, राजाभाऊ म्हस्के, बाळासाहेब कांबळे,शोभा कडोळकर, संतोष वाघमारे,हेमंत यादव, छाया लोंढे उपस्थित होते.
सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमण विरोधी कारवाईत धनराज सोनकांबळे या पथारी विक्रेत्याला पालिका अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याने सोनकांबळे यांच्या डोक्याला दुखापत झाली. हातावर पोट असणाऱ्या गरीबांचा बळी गेल्यावर पालिका त्यांच्या हक्काबाबत जागी होणार का ? असा सवाल या पत्रकात विचारण्यात आला आहे. या निवेदनात ठोस कृती कार्यक्रमाची मागणी केली आहे.
पथ विक्रेत्यांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांना परवाने वितरित करावेत, अतिक्रमण गोडाऊन सुरक्षा रक्षक यांच्या इतर दुसऱ्या विभागांमध्ये तात्काळ बदल्या करा,
पुणे महानगरपालिकेत शहर विक्रेता समितीसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, पथ विक्रेत्यांवर होणारी अतिक्रमण कारवाई थांबवावी, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्वरित अंमलात आणाव्यात, अतिक्रमण कारवाई करताना किमान तीन वेळा लेखी नोटीस द्यावी, महानगरपालिकेच्या नव्या हद्दीत पथ विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करावी, पथ विक्रेत्यांच्या दंडाच्या रकमेचा फेरविचार करून दंड कमी करावा,अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनिमियन अधिनियम 2014 मधील तरतुदीचे प्रशिक्षण देवूनच त्यांच्या नियुक्त्या कराव्या अशा प्रलंबित मागण्या या पुन्हा मांडण्यात आल्या.