पुणे : पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणी कपात करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशीरा अथवा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे लागणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती व जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिली. त्यामुळे पुणेकरांनी गुरूवारी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पुण्यात सहकारनगरमधील काही भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार आहे. पर्वती येथील टाक्यांमधून पाणीपुरवठा होणाऱ्या सहकारनगरमधील काही भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (दि.६) बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पुण्यातील खडकवासला धरणसाखळीत १९.४१ टीएमसी म्हणजेच एकूण ६६.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षापेक्षा दीड टीएमसी जादा पाणीसाठा, शेतीचे आवर्तन बंद असल्याने राजगड तालुक्यातील पानशेत, वरसगाव धरणांमधून विसर्ग बंद करण्यात आला आहे.
पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी ७० टक्क्यांहून अधिक आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्याने कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरू करण्यात येणार आहे. पिण्यासाठी तसेच शेतीसाठी खडकवासलाच्या लाभ क्षेत्रातील शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यापर्यंतच्या ६६ हजार हेक्टर शेतीसह या भागातील लाखो रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणसाखळीवर अवलंबून आहे. दौंड, हवेली, इंदापूर तालुक्यांतील ६६ हजार हेक्टर शेतीसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची तहान खडकवासला धरणसाखळीवर अवलंबून आहे.
‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार
गोविंद गौरव सोसायटी, स्वानंद सोसायटी, नामदेव सोसायटी, मेघना सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर क्रमांक २ कमानीच्या आतील भाग, संत ज्ञानेश्वर सोसायटी, लकाकि सोसायटी, अण्णा भाऊ साठे वसाहत, शाहू वसाहत, लक्ष्मीनगर मनपा शाळा १११ जवळील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.