पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पुणे पोलिसांनी १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तब्बल २१ आरोपींविरोधात भक्कम पुरावा गोळा करून हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, टोळी प्रमुख हा सोमनाथ सयाजी गायकवाड असल्याचेही दोषोरापत्रात म्हंटले आहे.सोमनाथ गायकवाड, संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर, आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम, व समीर काळे यांच्यासह २१ जणांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. तसेच, यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा टोळी युद्धातून १ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घुन खून केला होता. या खूनाने शहरात मोठी खळबळ माजली होती. यात वनराज यांची बहिण तसेच भाऊजी यांचा सहभाग निष्पन्न झाला होता.
दरम्यान, आंदेकर कुटूंबियांसोबत वनराज यांची बहिण संजिवनी कोमकर व तिच्या कुटूंबियांचे प्रॉपर्टीवरून वाद होते. त्यातच नाना पेठेत संजिवनी कोमकर यांच्या दुकानावर पालिकेने अतिक्रमण कारवाई केली होती. ही कारवाई वनराज यांनी करण्यास लावली, असा समज कोमकर कुटूंबाचा होता. त्याचा राग त्यांच्यात मनात होता. घटनेच्या दोन दिवसांपुर्वी यावरून त्यांच्यात वादविवाद झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात दुसरे महत्वाचे कारण सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील सदस्य निखील आखाडे याचा खून कृष्णा आंदेकर व त्याच्या साथीदारांनी केला होता. त्यावरून आरोपींनी एकत्रित येऊन कट रचून वनराज आंदेकर यांच्या खूनाचे प्लॅनिंग केले. तसेच, त्यांचा निर्घुन खून केल्याचे समोर आले.
वनराज यांच्या खूनप्रकरणाने पुन्हा शहरात टोळी युद्ध भडकण्याची चिन्हे दिसत होती. दरम्यान, खूनानंतर पोलिसांनी वाई परिसरातून आरोपींना पकडले होते. त्यांच्याकडून ८ पिस्तूल, १३ जिवंत काडतूसे, ७ कोयते, ७ दुचाकी ३ कार जप्त केल्या होत्या. पोलिसांनी गुन्याचा तपास करून एकूण २१ आरोपींना याप्रकरणात अटक केली. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच, ३९ साक्षीदार देखील तपासले आहेत. त्यानूसार पोलिसांनी तपास पुर्ण करून मोक्कानुसार १७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
दोषारोप पत्रातील महत्वाचे मुद्दे
घटनास्थळ, आंबेगाव पठार, दापोली येथील सीसीटीव्ही फुटेज
आरोपींच्या आवाजाचे नमुने
मोक्का कलम १८ चा जबाब
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १८३ प्रमाणे कार्यवाही
आरोपींची ओळख परेड
आरोपींनी मोबाईलद्वारे केलेले संभाषण व तांत्रिक विश्लेषण
आरोपींचे जुने गुन्हेगारी रेकॉर्ड
गोपनीय साक्षीदारांकडे तपास
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे केलेला तपास