पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने एक दिवसीय कायदा साक्षरता कार्यशाळा अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे व फर्ग्युसन महाविद्यालयाचे उप प्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संगीता जगताप यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. विजय घारे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. भरत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये कायदा साक्षरता या विषयावर आपल्या विचाराची मांडणी करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा घटना व त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या विविध कलमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच महिला या समाजातील मुख्य घटक असून त्यांचे आदर व संरक्षण करण्याची जबाबदारी आपली असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. द्वितीय सत्रामध्ये 'कायदा साक्षरता व भारतीय संविधान' या विषयावर भाष्य करताना डॉ. प्रकाश पवार यांनी ब्रिटिशांनी आपल्या शासन काळात वेगवेगळ्या घटकांसाठी बनवलेल्या कायद्यांचा आढावा घेत राजा राम मोहन रॉय यांचे सती प्रथा बंद करण्यासाठीचे योगदान तसेच लॉर्ड पेंटिंग च्या सुधारणा विषयक कायद्यांवर सविस्तर विवेचन केले. त्याचबरोबर सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करत भारतीय संविधानाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी कायदा साक्षरता या विषयावर नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून नियम व कायदे पाळण्याचे मत व्यक्त केले.महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. भरत राठोड, सूत्रसंचालन प्रा. सुषमा सोनार तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा खैरनार यांनी केले. या कार्यशाळेसाठी सुमारे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित राहिले असून यशस्वीतेसाठी डॉ. वैशाली बन्सोड, डॉ. मनीषा शेवाळे, प्रा. अनंत पवार, डॉ. विजय बालघरे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, डॉ. विठ्ठल नाईकवाडी, प्रा. प्रीती जोशी, डॉ. उमराव सय्यद, डॉ. ज्योती रामोड, प्रा. फातिमा सय्यद, प्रा. अर्चना सुर्यवंशी, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रणित पावले, वीरेन चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.