पुणे : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राज्याचे मंत्री मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी सपत्नीक भेट देत त्यांची विचारपूस केली. तीन दिवस गुजरात आणि दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मोहोळ यांनी पुण्यात परतताच थेट देवेंद्रच्या घरी जाऊन संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
या मारहाणीत देवेंद्र जोग गंभीर जखमी झाले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
देवेंद्र जोग हे एक कर्तबगार संगणक अभियंता असून मितभाषी आणि शांत स्वभावाचे आहेत. कोणालाही विनाकारण त्रास न देणाऱ्या अशा तरुणावर हल्ला होणे, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. आज देवेंद्रवर हल्ला झाला, तर उद्या कोणत्याही तरुणावर असा प्रकार घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.