पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांची अवस्था सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे शहरात अत्याधुनिक आणि आकर्षक मेट्रो स्थानके उभारण्यात आली असताना, पिंपरी-चिंचवडमधील स्थानके मात्र दुर्लक्षित असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पिंपरी ते निगडी या चार किलोमीटर अंतरासाठी मेट्रो मार्गाचा विस्तार होणार आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी चौक, निगडीतील टिळक चौक आणि भक्ती-शक्ती समोरील परिसरात नवीन स्थानके होणार आहेत. मात्र, या स्थानकांच्या सौंदर्याकरणाबाबत आणि सुविधांबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पिंपरी-चिंचवड हे महापालिकेच्या उत्पन्नात मोठा वाटा उचलणारे शहर असूनही, महामेट्रो कॉर्पोरेशनकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांच्यात भेदभाव होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पुणे मेट्रो स्थानकांची रचना भव्य आणि आकर्षक असून, तेथील सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या स्थानकांमध्ये तितकीच गुणवत्ता आणि सुविधा का नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मात्र या आरोपांचे खंडन करत, सर्व स्थानके नियोजित पद्धतीनेच उभारली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधी यावर ठोस उत्तर मिळावे, अशी मागणी करत आहेत.
या बाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घेऊन मेट्रो प्रशासन व सरकार यांच्यावर दबाव टाकण्याचे काम करणे अपेक्षित आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहराला ऐतिहासिक तसेच औद्योगिक पार्श्वभूमी आहे. पिंपरी चिंचवड येथील मेट्रो स्थानके देखील त्यादृष्टीने घडविता येऊ शकतात मात्र शहरातील राजकीय इच्छाशक्ती कुठे तरी कमी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये तयार होताना दिसत आहे.