पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंचच्या वतीने सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्या डॉ. चंदा हासे, विद्यार्थीनी मंच समन्वयक प्रा. रुपाली रसाळे, शारिरीक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांना जागतिक महिला दिनाची संकल्पना स्पष्ट करत असताना प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी महिला दिनाची सुरूवात कशी झाली याबद्दल माहिती देत आज प्रत्येक क्षेत्रात महिला उल्लेखनीय कार्य करत असल्याचे नमूद केले. तसेच कोणीही एक श्रेष्ठ नसून आदर्श समाजाच्या पायाभरणीसाठी स्त्री पुरुष समानता असणे आवश्यक असल्याचे सांगत जीवन हे खूप सुंदर असून ते प्रत्येकीने पूर्णपणे जगले पाहिजे असे मत व्यक्त केले.
सदर विविध गुणदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र, व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील प्राध्यापक तसेच प्रशासकीय सेवक व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पोवाडा, नृत्य, काव्य वाचन, गायन, व्याख्यान अशा विविध कलांचे सादरीकरण केले. महिला दिनानिमित्त आपल्या कलांचे सादरीकरण करताना उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत बाईपण भारी देवा याचा प्रत्यय दिला. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत यशस्वी कार्यक्रम घडवून आणला.