पुणे : धुळवड हा होळीची राख आणि माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी केला जातो. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली जात असून एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त केला जातो. यानिमित्तानं पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 'रंग बरसे' या कार्यक्रमात वंचित घटकातील मुलांनी विविध गाण्यांवर डान्स करत एकमेकांना रंग लाऊन आनंद लुटला.
रंग बरसे या उपक्रमाचं यंदाचं ३० वं वर्ष आहे. यंदाचा हा कार्यक्रम रास्ता पेठेतील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसंच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी एकमेकांना रंग लावत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं ऊसतोडणी कामगारांची मुलं, देवदासींची मुलं, अनाथ, अंध, मूकबधिर तसंच रस्त्यावर फुगे विकणारी, कसरतीचा खेळ करणारी यासह विविध सामाजिक संस्थांमधील मुला-मुलींनी रंग बरसे कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी एकमेकांना रंग लाऊन पाण्यात भिजत विविध गाण्यांवर डान्स करत या मुलांसह उपस्थितांनी धुळवड साजरी केली.

"अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो. संवेदनशीलपणाने उत्सव साजरे केले जातात. ज्या मुलांना उत्सव साजरा करता येत नाही, अशा विशेष मुलांसोबत उत्सव साजरा केला जात आहे. याचा आनंद असून मी प्रत्येकवर्षी रंग बरसे या कार्यक्रमाला हजेरी लावत असतो," अस केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
"गेल्या ३० वर्षापासून समाजातील विशेष मुलांसोबत रंग बरसे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाची विशेष बाब म्हणजे २५०० हून विशेष मुलं या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत. दुसरी विशेष बाब म्हणजे प्रयागराज इथं जो कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. तिथलं गंगा नदीचं पाणी आणलं असून त्या पाण्यानं मुलं-मुली धुळवड साजरी करत आहेत," असं भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई म्हणाले.