सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

जुन्नरची उमेदवारी मशालीला द्यावी. निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवतील

डिजिटल पुणे    10-10-2024 15:52:40

जुन्नर : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जागावाटपात जुन्नरची जागा ठाकरे गटालाच मिळावी यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नारायणगाव येथे पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत जाहीर होईल. अशात जुन्नर विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागावाटपाबाबत तालुक्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यामुळे सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडला आहे. तालुक्यातील शिवसैनिक व मतदारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भुमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

जुन्नरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी. मशाल या चिन्हावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निष्ठावंत शिवसैनिक उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणू असे मत उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केल. शिरुर लोकसभा आणि जुन्नर तालुक्यात शिवसेना संघटना टिकवून ठेवायची असेल तर यावेळी आमदार शिवसेनेचाच व्हावा यावर शिवसैनिकांचे एकमत दिसून आले. 

जुन्नर तालुक्यात शिवसेनेची ताकत महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या तुलनेने जास्त आहे. भगवा सप्ताहाच्या निमित्ताने तालुक्यातील गावागावात, वाड्या-वस्त्यांवर फिरताना शिवसैनिकांनी जुन्नरची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही मागणी केलेली आहे. याबाबत शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. याशिवाय १९९५ पासूनची आकडेवारी काढली तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला ६० हजारांपेक्षा अधिकची मत मिळाली आहेत. पक्ष संघटना तालुक्यात मजबूत असल्याचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी सांगितले. तसेच, विद्यमान खासदार या तालुक्यातील असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आहेत. लोकसभेला शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम करून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तालुक्यात ५१३९३ इतके मताधिक्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. 'खासदारकीला तुम्ही आमदारकीला आम्ही' अशी भावना शिवसैनिकांची झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर राष्ट्रवादीचे बहुसंख्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचा ६० ते ७० टक्के मतदार हा विद्यमान आमदारांसोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानाच्या आकडेवारीवरून ते दिसूनही येत आहे. असे असताना महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवारच खेचून आणू शकतो. अशी माहिती यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, तालुक्यात राजकीय हालचाली शिवसेनेला गृहीत धरून काही वेगळ्याच सुरू असल्याचे दिसत आहे. काही लोकांना आयात करून त्यांना तिकीट दिल जाण्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. हे शिवसैनिक खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीत चाललेल्या घडामोडींमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष वाढत आहे. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका बैठकीदरम्यान 'शिवसेनेला मानाचं पान दिल जाईल' अस वक्तव्य केलं होत. त्याचाच दाखला देत आता आम्हाला न्याय पाहिजे असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच, जागावाटपात काही दगाफटका होऊन शिवसेनेला तिकीट मिळाले नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर शिवसैनिक ठरवतील तो उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेनंतर जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीत खळबळ उडणार आहे. 

यावेळी उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, तालुका समन्वयक बाबा परदेशी, मा जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर गाडगे, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, उपतालुका प्रमुख बन्सी चतूर, उपतालुका प्रमुख उत्तम काशीद, उपतालुका प्रमुख मोहन बांगर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत डोके, उपतालुका प्रमुख सुनील पवार, उपतालुका प्रमुख राहुल सुकाळे, तालुका युवा अधिकारी शांताराम सावंत, विभाग प्रमुख खंडू शिंदे, विभाग प्रमुख अजित सहाणे, उपविभाग प्रमुख रामदासनाना नायकोडी, शहरप्रमुख समीर भगत यांसह शिवसैनिक व पत्रकार उपस्थित होते.


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
Sandesh gaikwad
 10-10-2024 22:35:35

Maulishet khandagale Junner vidhansabha amdar honar100%

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती