सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

बीडच्या संतोष देशमुखांच्या परिवाराची शरद पवारांनी घेतली भेट; केली मोठी घोषणा

डिजिटल पुणे    21-12-2024 15:31:45

मुंबई : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराची शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवारासाठी मोठी घोषणा केली.

शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबियांकडून समजून घेतला. त्यानंतर शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी गावकऱ्यांनी आम्ही सगळे भयभीत आहोत. उद्या कुणाचा नंबर लागेल, याचा नेम राहिला नाही, असे म्हटले. तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सर्वसामन्यांना धक्का बसला आहे. बीडमधील घटना ऐकून सभागृह गंभीर झालं, मी त्यांच्या सभागृहात नाही पण ऐकत होतो. या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे. ज्या सरपंचांनी १५ वर्षे काम केलं त्यांची हत्या केली गेली. हे अतिशय गंभीर आहे, मुख्यमंत्री यांनी आश्वासन आणि रक्कम दिली मात्र याने कुटुंबाची दुःख जावू शकत नाही. दहशतीचे वातावरण आहे याला आपण सर्व जण तोंड देऊ. देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या वस्तिगृहात पाठवा, तिच्या कॉलेजपर्यंतचे सर्व शिक्षण आम्ही करतो”, असे त्यांनी म्हटले.

तसेच सरकारने मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना रक्कम दिली, त्याची मदत होईल. पण गेलेला माणूस पुन्हा येत नाही. मदत दिली तरी कुटुंबाचे दु:ख कमी होणार नाही. आम्ही केलेल्या मदतीवर टीका करत नाही. पण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तातडीने आरोपीला धडा शिकवला पाहिजे. इथल्या वकिलांनी लेखी निवेदन दिले, याचा आनंद आहे. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोक प्रतिनिधी वकील मंडळी तुमचे हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडे पाहत आहेत. या गावातील दहशतीच्या वातावरणाला एकत्र तोंड देऊ. देशमुख कुटुंबाच्या दु:खात आपण सर्व सामील होऊ. राज्य आणि केंद्र सरकार जोपर्यंत या प्रकरणी सखोल चौकशी करीत नाही, आरोपीला शिक्षा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही यावेळी शरद पवारांनी दिला.

नेमकं काय आहे प्रकरण?

केज तालुक्यामध्ये १२ डिसेंबरला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची किडनॅप करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सभागृहात विरोधी आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आवाज उठवला. या हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे. सभागृहातही आमदारांनी वाल्मिक कराड याला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करत परिवाराला १० लाख रूपयांची मदत केली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती