मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज ( 23 डिसेंबर) भेट घेतली. "राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. त्यामध्ये ओबीसी समाजाचं मोठं पाठबळ होतं. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली," अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
"ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही. राज्यात जे काही सुरू आहे, त्यामुळं मला आठ ते दहा दिवस द्या. आठ ते दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू," असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. "आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल, त्याबाबत आपण संपूर्ण चर्चा करू," अशी विनंती देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं पुढील आठ ते दहा दिवसांनंतर नेमका काय निर्णय होतो, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
छगन भुजबळ सातत्यानं अजित पवारांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना डावलत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी तरुणांना संधी देण्याचं वक्तव्य केलं होतं, त्यावरूनही भुजबळांनी पलटवार केला. पवार व भुजबळांमध्ये शाब्दिक युध्द सुरु झालं आहे. नाशिकमधून मंत्री पदाची संधी दिलेल्या माणिकराव कोकाटे यांंच्या बॅनरवरुन भुजबळांचं छायाचित्र देखील हटवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध झाल्याचं समोर आलं होतं.
नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर देखील छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेत थांबावं लागलं, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा...म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसं शक्य आहे?, असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असं छगन भुजबळांनी सांगितले.