सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही; नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान

डिजिटल पुणे    25-12-2024 18:34:16

नागपूर : राज्यातील बीड आणि परभणी येथे घडलेल्या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनांवरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच महाराष्ट्राची पुढची वाटचाल कशी असेल याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. हा मंत्रीही नव्हता, नवखा आहे, मग कारभार कसा करणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं, सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रि‍पदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की, आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊन दिला नाही. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले. पायाभूत क्षेत्रात आपण मोठी भरारी घेतली. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपण ऊर्जा विभागाचा २५ वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढच्या दोन-तीन वर्षात अशी परिस्थिती येईल की, आपण उद्योगासहित सर्वप्रकारच्या वीजेचे दर कमी करु शकतो, अशी व्यवस्था आपण उभारली आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की,”गडचिरोलीत नक्षलवाद कमी आहे, आता खोलमध्ये आपण जाऊ लागलो आहे. पुढच्या काळात निकराची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडचिरोलीचे चित्रही आपण बदलणार आहोत. याशिवाय, आपण राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार असून हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. तसेच विदर्भाला औद्योगिक इकोसिस्टिम मोठ्या प्रमाणात उभी राहत आहे. या योजनांचा भार अर्थसंकल्पावर पडेल. पण याचं नियोजन आम्ही योग्य रितीने करत आहोत. कोणाच्या मनात शंका नको म्हणून लाडकी बहीणचा हफ्ता आम्ही जमा करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण  यांनी एका वर्षात महाराष्ट्राला २० लाख घरे देण्याची घोषणा केली आहे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच २०११ ची यादी चुकीची असून घरांची नोंदणी पुन्हा करण्याची परवानगी आम्ही केंद्राकडे मागितली आहे. २६ लाख लोकांपैकी २० लाख लोकांना घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यातील अटी, शर्थी केंद्र सरकारने रद्द केल्या आहेत. पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून आणखी एक नोंदणी करुन पुढच्या पाच वर्षात सर्वांना हक्काचे घर दिले जाणार असून त्यांना सोलर दिले जाणार आहेत. जेणेकरुन त्यांना वीज बील येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. आपला प्रतिनिधी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अमूलाग्र बदल करतो, याचा नागपूरकरांना अभिमान वाटेल. कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी धैर्यपूर्वक आव्हानांचा सामना मी करतो. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे, त्यामुळे सत्ता माझ्या कधीही डोक्यात जाणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

सायबर गुन्हे  हे आपल्या सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे, तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले आहे. काही लोक याचा दुरुपयोग करतात. यासंदर्भात सायबर जनजागृती कॅम्पेन केले जात आहे. देशातला सर्वात मोठा सायबर प्लॅटफॉर्म आम्ही महाराष्ट्रात तयार केला आहे. चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट आपण एक्स, व्हॉट्सअॅप, फेसबुकवर टाकली की त्याची डिजिटल फूटप्रिंट आपल्याला मिळते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार होतो. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करू नये. जोपर्यंत जागरूकता निर्माण होऊ शकत नाही, तोपर्यंत हे आव्हान राहणारच आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना नागपूरातील प्रसारमाध्यमांचे आभार मानले.ते म्हणाले की, लोकसभेत महायुतीला फेक नरेटिव्हचा मोठा फटका बसला होता. तो फेक नरेटिव्ह आम्ही प्रसारमाध्यमांमुळे ब्रेक करु शकलो. भाजपने महाराष्ट्रात १३२ जागा जिंकून राजकीय जीवनातील उच्चांक गाठला. महायुतीलाही मोठा विजय मिळाला. मात्र, जनमताचा हा प्रचंड मोठा कौल मिळाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. या विजयासोबत आमच्यावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती