सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गुन्हेगार माझ्या जवळचा असला, तरी…”

डिजिटल पुणे    26-12-2024 17:25:37

मुंबई : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात केला जात आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, खाते वाटपानंतर आज मी पहिल्यांदाच विभागाची बैठक घेतली. १०० दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्र्याशी कोणतीही भेट चर्चा झाली नाही. योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे होते. त्यामुळे त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांना नमस्कार केला. यानंतर आता बीड प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे.

संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होता. देशमुख हत्या प्रकरणात जो कुणी गुन्हेगार आहे, मग तो कुणीही असो, कुणाच्याही जवळचा असो, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडू नका, मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण सुरू असून त्यासाठी माझ्या नावाचा वापर होत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. देशमुख हत्या प्रकरण गंभीर असून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणाबाबत मी पहिल्या दिवशीच पक्षाच्या नेतृत्त्वाशी चर्चा केली असून सगळी कल्पना त्यांना दिली असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

वाल्मीक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्याशी होती. माझ्यासोबतही आहे. या प्रकरणातील आरोपी माझ्यासह कोणाचाही निकटवर्तीय असला तरी सोडता कामा नये. त्याला शिक्षा झाली पाहिजे असेही मुंडे यांनी म्हटले. गुन्हा दाखल झालाय, त्याची चौकशी पोलीस करत आहे. अतिशय पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. शासन कोणालाही पाठीशी घालत नाही.

पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजाडत नसेल तर आपण काही बोलू शकत नाही. माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे, हे प्रकरण भयंकर आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती