मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीमधील भाजपाच्या महाविजय अधिवेशनात केलेल्या टीकेला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "देशानं अनेक उत्तम प्रशासक आणि गृहमंत्री पाहिले आहेत. मात्र, देशानं तडीपार केलेले गृहमंत्री पाहिले नाहीत", असा टोला राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाह यांना लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार म्हणाले, "गृहमंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे. ४० वर्षांपूर्वी टीका करणारे गृहमंत्री कुठे होते, हे माहित नाही. जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केलं आहे. वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचं नेतृत्व प्रभावी होते. आधीच्या राजकीय नेत्यांमध्ये सुसंवाद होता. आता तसे दिसत नाही. आताच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत. अमित शाहांची टीका जिव्हारी लागली नाही. उद्धव ठाकरेही बाळासाहेबांच्या टीकेला उत्तर देतील".
पुढे शरद पवार म्हणाले, " ते गुजरातमध्ये राहू शकत नव्हते. तेव्हा सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे गेले. अमित शाह यांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला होता. उद्धव ठाकरेंबाबत केलेले वक्तव्य भाजपा किती गांभीर्याने घेईल? हे माहित नाही". आपण कृषिमंत्री असताना सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले, याची आठवणही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी करून दिली.