सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी! या कारणामुळेे राष्ट्रवादीची बीड जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी बरखास्त

डिजिटल पुणे    15-01-2025 15:39:20

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर केवळ बीडच नव्हे, तर संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. सध्या या प्रकरणामुळे मराठवाड्यात संतापाची लाट उसळली असून विविध भागांमध्ये आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे, याच प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचे नाव समोर आले होते. यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने एक मोठे पाऊल उचलले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी आणि सर्व तालुका कार्यकारिण्या तत्काळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विष्णू चाटे नाव समोर येताच त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे नवीन नेमणुका होईपर्यंत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजेश्वर चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच, भविष्यात जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांची नियुक्ती करताना त्यांच्या चारित्र्याची काटेकोर तपासणी करण्याचे आदेशही पक्षाने दिले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीडमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतरच्या हिंसक आंदोलनांबाबत अजित पवार यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती