सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तींना स्थगिती; महायुतीत नाराजीचे सूर

डिजिटल पुणे    20-01-2025 17:53:01

 मुंबई : राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अखेर १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, काही जिल्ह्यांतील निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील पालकमंत्री नियुक्तींना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १९ जानेवारी रोजी स्थगिती दिली. यामुळे महायुतीमधील असंतोष नव्याने उफाळून आला आहे.

रायगडमध्ये तटकरेंना विरोध

रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्याने शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक आमदारांमध्ये नाराजी आहे. स्थानिक आमदारांनी फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची या पदासाठी जोरदार मागणी केली होती. मात्र, त्यांची संधी हुकल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे भरत गोगावले यांनी या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करत हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचारावा, अशी मागणी केली आहे.

खरे तर, गेल्या काही वर्षांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावर वाद सुरु आहे. २०२२ मध्ये शिवसेना फोडल्यानंतर आदिती तटकरे यांना पुन्हा या पदावर संधी मिळू नये यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. मात्र, आता तटकरे यांना संधी दिल्यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे.

नाशिकमध्येही असंतोष

तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे  यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्याऐवजी हे पद जळगावचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विरोध वाढला आहे. परिणामी सरकारने नाशिकच्या पालकमंत्रीपदालाही स्थगिती दिली आहे.

दरम्यान, या दोन्ही जिल्ह्यांतील नियुक्त्यांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेता सरकारने नियुक्त्या स्थगित केल्या असल्या तरी हा मुद्दा पुढे आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती