मुंबई : गुरुवारी मुंबईमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्येच आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुमच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही. मोदी आणि शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत.” अशी टीका राऊत यांनी शिंदेंवर केली आहे.
एकनाथ शिंदेंवर टीका करत राऊत म्हणाले की, “शिंदे हे काही शिवसेनाप्रमुख नाही की शिवसेनाप्रमुखांचे वारसदारही नाहीत. शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीताने पळून गेले आहेत. शिंदेंच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका. कधी एक पुस्तक तरी वाचलंय का? पेपर तरी वाचतो का हा माणूस. काय म्हणतो. आमचं बघू ना आमची मनगटं, तुमच्यावर मनगटं चावण्याची वेळ येणार आहे.”
त्याचबरोबर, “आमच्या दंडात दम नाही म्हणता तुमची चड्डी सांभाळा. तुमच्या चड्डीचा नाडा दिल्लीवाल्यांच्या हाती आहे. ते कधीही खेचतील आणि नागडे व्हाल. आम्ही लाचार नाही. आम्ही सत्तेसाठी आलेलो नाही. आमचा पक्ष आहे. तुमच्यासारखे लाचार येतात आणि निघून जातात. मोदी आणि अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात मुजरे घालण्यासारखं आहेत. तुमची सत्ता आणि प्रतिष्ठा कायम राहणार नाही. तुम्ही तात्पुरते आहात.” अशा शब्दात राऊत यांनी शिंदेंवर घणाघाती प्रहार केला.