मुंबई : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी योगी सरकारने पूर्ण व्यवस्था केली आहे. मात्र तरी देखील मौनी अमावस्येच्या रात्री संगमच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील प्रयागराजला गेले असून गंगामध्ये पंतप्रधान अमृत स्नान करणार आहेत. यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाकुंभमेळ्यावरुन सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाकुंभमेळ्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “मी काल संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात जी दुर्घटना घडली प्रयागराज महाकुंभ उत्सवात. महाकुंभ आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेचा, आस्थेचा धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी भावनिक नात्याने जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करुन आले. मी पुढच्या आठवड्यात स्वत: कुंभला जाण्याची योजना आखत आहे. पण शेवटी दुर्घटना घडली, त्याला कोणीतरी जबाबदार आहे. त्या दिवशी ज्या पद्धतीने चेंगराचेंगरी झाली, याची कारणं काय आहेत आणि नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले हा माझा प्रश्न होता. सरकारमुळे झालं असं मी म्हणत नाही किंवा विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही तिकडे दोन ते अडीच हजार लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत” असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे खासदार राऊत यांनी प्रयागराजमधील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या मृतदेहावरुन गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “चार दिवसांपूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून प्रेत बाहेर काढण्यात आली. नक्की मृतांचा आकडा किती आहे? लोकामध्ये चर्चा आहे, दोन ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. साधारण 1500 ते 2000 लोक मरण पावले असावेत. तिथे 30 हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही फुटेज लोकांसमोर का आणत नाही. सत्य लोकांसमोर येईल” असं संजय राऊत म्हणाले. “2 हजार लोक आजही त्या दिवसापासून बेपत्ता आहेत, त्यांचं काय झालं? याचा अर्थ 2 हजार लोक मरण पावली का? प्रेत गायब केली का? यावर सत्ताधारी बकाावरुन विरोध सुरु झाला उपसभापतींनी माझा माईक बंद केला” असा दावा संजय राऊत यांनी केला.
पुढे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरुन गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे मंतरलेले रेड़्याची शिंग पुरलेली असल्यामुळे राहायला जात नसल्याचा गंभीर दावा संजय राऊतांनी केला आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर कधी रहायला जाणार त्याबद्दल सांगावा. मी त्यांच्या भूमिकेच स्वागत करतो. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार आहे. अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे. पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, मुख्यमंत्री वर्षावर का रहायला जात नाहीत?. त्यावर मी माझ्याकडची माहिती त्यांना दिली. मी सुद्धा पत्रकार आहे. लोक मला काही गोष्टी सांगतात. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर रहायला जावं, ते त्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आमचे मुख्यमंत्री जात नाहीयत, ते ताक फुंकून पितायत असं मला दिसतंय” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.