मुंबई : विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात अस्थिरता निर्माण झाली आहे. आता पक्षातील अनेक नेत्यांना त्यांच्या भविष्यासंदर्भात चिंता वाटू लागली आहे. अशातच, ठाकरे गटातील ६ खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संसदीय अधिवेशनाच्या आधी हे खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील. त्यामुळे ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसू शकतो.
खरे तर, गेल्या काही दिवसांपासून “ऑपरेशन टायगर” या मोहिमेची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. ठाकरे गटातील काही प्रमुख नेते आणि काँग्रेसमधील काही नेते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. महत्वाचे म्हणजे, ठाकरे गटाच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु हे खासदार नेमके कोणते आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाही.
ठाकरे गटाचे आमदारही संपर्कात?
दरम्यान, ठाकरे गटातील फक्त खासदारच नव्हे तर आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा खुलासा आता झाला आहे. परंतु या खासदारांच्या आणि आमदारांच्या प्रवेशाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. यामध्ये शिंदे गटाला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याने लवकरच ठाकरे गटातील आमदार आणि खासदार संजय गटात येतील, असे म्हटले जात आहे.
खासदार ठाकरे गट का सोडू इच्छितात?
सध्याची ठाकरे गटाचे राजकीय स्थिती पाहिला गेले तर ठाकरे गटाकडे राजकीय स्थैर्य आणि निधी नाही. अनेक आमदारांमध्ये निधी वाटपाबाबत नाराजी आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने चांगली कामगिरी केली आहे. यात शिंदे गटाला भाजपची जोड असल्यामुळे शिंदे गटाचे बळ आणखीन वाढते आहे. अशा अनेक विविध कारणांमुळे ठाकरे गटातून खासदार आणि आमदार बाहेर पडण्याचा विचार करत आहेत.