मुंबई: राज्याच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचे कारण प्रवासाचा ताण असल्याचे सांगितले आहे.
मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत आणि वाशिमच्या पालकमंत्री पदामुळे त्यांना सातत्याने कोल्हापूर, मुंबई आणि वाशिम असा मोठा प्रवास करावा लागत होता. तब्बल ८०० किमीच्या सततच्या प्रवासामुळे मतदारसंघाकडे पुरेसा वेळ देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, त्यांनी २६ जानेवारी रोजी वाशिम येथे ध्वजारोहण केल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात परत भेट दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नवा पालकमंत्री कोण?
मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानंतर आता वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाईल, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी नाही, त्यामुळे हे पद त्यांना दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार गटाला दुसरा मोठा धक्का
हसन मुश्रीफ यांचा हा निर्णय अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनीही आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत नाराजीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महायुतीतील हे बदल आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.