सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 व्यक्ती विशेष

पिंपरी चिंचवडमध्ये शिंदे गटाचा आणखी एक मोठा राजकीय झटका; ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे यांचा प्रवेश

अजिंक्य स्वामी    13-03-2025 10:39:16

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरच्या जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही दिवसांतच पिंपरी चिंचवडमधील ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

बुधवारी (१३ मार्च) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुलभा उबाळे यांनी अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख निलेश तरस आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, सुलभा उबाळे यांचे पुत्र अजिंक्य उबाळे यांनीही याच वेळी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुलभा उबाळे यांच्या पक्षत्यागाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नसल्याने आणि काम करण्याची संधी न मिळाल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे उबाळे यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधील तिन्ही मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने सोडून दिल्यामुळे पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला फायदा?

सुलभा उबाळे या पिंपरी चिंचवडमध्ये एक फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला आगामी महापालिका निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. अवघ्या काही दिवसांतच हा दुसरा मोठा प्रवेश असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात “डबल लॉटरी” लागल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.राज्यातील आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षबदलाचे हे सत्र आणखी किती नेत्यांना आपल्या लाटेत सामावून घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती