सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडताना ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप ; व्हायरल झालेला 'हा' व्हिडीओ पाहिलात का ?

पुजा    26-04-2024 16:45:01

पुणे : कागदोपत्री ८ किंवा ९ तासांचं काम फार क्वचितप्रसंगी नियमानुसार निर्धारित वेळेपुरता मर्यादित असतं. अनेकदा सुट्ट्यांना हसतच तिलांजली द्यावी लागते आणि पगारवाढीविषयी काही मंडळींशी न बोललेलंच बरं. वर्षानुवर्षं एखाद्या संस्थेमध्ये काम करूनही पगारात होणारी तुटपुंजी वाढ म्हणजे त्या कर्मचाऱ्याच्या कामाची उपरोधिक पोचपावतीच म्हणावी लागेल. अशी सध्या मार्केटमध्ये परिस्थिती असताना पुण्यातील एका तरुणाने आपल्या 'टॉक्सिक नोकरीच्या शेवटच्या दिवशी असे काही केले की, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्याने नोकरीच्या शेवटच्या दिवशी ढोल वाजवत बॉससमोर डान्स देखील केला. 

पुण्यात सेल्स असोशिएट म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं नोकरीच्या शेवटच्या दिवशी केलेला कल्ला अनिश भगत या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरनं त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला. या व्हिडीओनुसार जवळपास मागील तीन वर्षांपासून तो एका अशा कंपनीत काम करत होता जिथं त्याला नाही म्हणण्याइतकीच पगारवाढ मिळालेली, शिवाय बॉसकडून दोन चांगले शब्दही त्याला  ऐकायला मिळत नव्हते. अपेक्षांच्या याच ओझ्यानं दबलेल्या अनिकेतनं अखेर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे मित्र त्याच्या या निर्णयानंतर नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याच्या ऑफिसखाली पोहोचले.  

इथं ऑफिसमधून बाहेर पडताना तो चक्क मनसोक्त नाचू लागला, आनंद अगजदी स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तितक्यातच ज्या बॉसचा उल्लेख त्यानं केला तोसुद्धा तिथं आला आणि त्याचा संताप अनावर झाला. अनिशनं हा व्हिडीओ शेअर करताना त्यामध्ये, 'तुमच्यातील अनेकजण या व्हिडीओशी एकमत करु पाहतील' असं म्हणत सध्याची तरुणाई आणि मध्यमवयीन पिढी नोकरी, अपेक्षांच्या चक्रात कशी अडकली आहे हे सांगत त्यांची होणारी घुसमट मांडण्याचा प्रयत्न केला.  

दरम्यान,  काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला असून त्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. एका यूजरने लिहिले की, "मला माहित नाही का, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटले." दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, "या डान्समुळे मला एक वेगळेच समाधान मिळाले आहे."दुसऱ्या एका सोशल मिडीया युजरने लिहले, "माझ्या आयुष्यात मी पाहिलेली सर्वात सकारात्मक आणि उत्साहवर्धक व्यक्ती आहे तू ."


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती