सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

अनिर्वाच्य निरुपण (भाग ४)

डिजिटल पुणे    28-04-2024 14:52:27

अनिर्वाच्य निरुपण (भाग ४)

अनुभव आणि अनुभविता | सकळ ये मायेचि करिता | ते माया मुळी नस्ता | त्यासी काय म्हणावे ||६/१०/३३||

अनुभव व अनुभव घेणारा हे दोनपण मायेमुळे आहे. ती मायाच मुळी नाहीशी झाली तर अनुभवाला जागा कशी शिल्लक राहणार ?मी आणि माझा अनुभव दोन्ही निराळे आहोत या द्वैताच्या मुळाशी माया आहे. वांझ बाईची मुलगी जशी खोटी तशी माया खोटी आहे. वेगळेपण खोटे आहे. कारण जीव आणि परमात्मा अभिन्न आहे. अध्यात्म सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. १.माया सत्य आहे असे मानून अध्यात्म सांगितले जाते २.माया मिथ्या आहे असे मानून स्वरूपाविषयी बोलले जाते. देहबुद्धीच्या स्तरावर जगणाऱ्या सामान्य लोकांना अध्यात्म समजून सांगण्यासाठी पहिली पद्धत वापरली जाते. समाधिस्थ साधकांसाठी दुसरी पद्धत वापरली जाते. समर्थ सद्गुरू दुसऱ्या पद्धतीने हा विषय सांगताना म्हणतात.


अजन्मा होता निजेला | तेणे स्वप्नी स्वप्न देखिला | सद्गुरूस शरण गेला | संसारदु:खे ||६/१०/३६||


ज्याला जन्ममरण नाही असा अजन्मा (आत्मस्वरूप जो आनंदात होता) झोपी गेला (स्वरूपाचा विसर पडला) आणि त्याला स्वप्न पडले (देह समजू लागला) की तो संसारदु:खात (भेदात अडकला) बुडालेला आहे. म्हणून घाबरून तो सद्गुरूस शरण गेला. सद्गुरू कृपेने मग त्याला संसार मिथ्या आहे, भय खोटे आहे आणि मी आत्मा आहे (स्वरूपाचे स्मरण) हे समजले. देहभाव गेला. जे आहे असे वाटत होते ते सगळे नाही असे झाले आणि जे नाही असे माहित होते ते नाही असे अनुभवाला आले. अशा प्रकारे आहे आणि नाही याच्या पल्याड तो गेला.  ते अमुक आहे किंवा अमुक नाही असे काहीच म्हणता येईना. केवळ अस्तित्व उरले.
झोपलेल्या माणसाला हलवून जागे केले की त्याला एकदम कळून चुकते की आपण घाबरत होतो आणि ज्यापासून भय वाटत होते ते स्वप्न व ते सगळे दृश्य खोटे होते. तसे सद्गुरूकृपेने एकदम कळून चुकते की मी देह नसून आत्मा आहे. मानवी ज्ञानात वस्तूबद्दल ती आहे किंवा नाही असे दोन प्रकारे ज्ञान होते. पण हे आहे वा नाही हे दोन्ही अनुभव अज्ञानाच्या क्षेत्रातील आहे. दृश्य विश्वाला लागू पडतात. पण आत्मस्वरूप आहे वा नाही याच्या कल्पनांच्या पलीकडचे आहे. ते केवळ आहे. हाच त्याचा स्वभाव आहे. म्हणून त्यास सत्ता म्हणतात.


आहे व नाही यात सामावलेले सर्व दृश्य विश्व लय पावले की शून्य उरते. आणि या शून्याच्या पलीकडे शुद्ध स्वरूप आहे. त्या स्वरूप ज्ञानाने समाधान होते. देहाचे व्यापार चालू राहिले तरी हे अभिन्नत्व तसेच राहते हीच सहजस्थिती आहे. अद्वैत चर्चेने आपण अज्ञानात आहोत याचे भान येते. या चर्चेने साधक जागा होतो. हे जागेपण दोन प्रकारचे. जीवाने स्वप्न बघितले त्या स्वप्नात त्याला गुरुचा शाब्दिक उपदेश मिळतो आणि तो त्या शब्दांनी स्वप्नातच जागा होतो. हे जागेपण स्वप्नातले होते. दुसरे एक जागेपण आहे ते मात्र खरेखुरे आहे. ते शब्दांचे नसून अस्तित्वगत आहे. दृश्य मिथ्या आहे हे पहिले जागेपण आणि ते दृश्य दृश्यपणाने नाहीसे होते आणि सगळीकडे आत्मस्वरूप भरून राहते हे दुसरे खरे जागेपण आहे. ते मात्र अनंत आहे. तिथे शब्द थिटे पडतात.

समासाचा शेवट करताना समर्थ सारांश सांगतात - जो अजन्मा म्हणून सांगितला तो तूच आहेस. तू स्वप्न पाहिले म्हणजे संसार पाहिला. मी आत्मा आहे हे जागेपण जाऊन मी देह आहे हे स्वप्न पाहिलेस. माझा संसार हा अनुभव म्हणजे स्वप्नातले स्वप्न. तरी सत्संगाने सार काय आणि असार काय याची जाणीव झाली. म्हणून सद्गुरू शरण गेलास आणि त्यांच्या शब्दांनी आत्मस्वरूपाचे विवेचन ऐकलेस. स्वप्नाचे भान आले. म्हणून स्वप्नातले स्वप्न नाहीसे झाले. ही जागृती खरी आहे असे वाटेल पण ती खरी नसते. दृश्य अनुभव लयाच्या अनुभवात विरतो. लय शून्यरूप असतो. शून्याचा अनुभव अनुभवरुपतेत विरून जातो. मी अनुभव घेतो आहे ही वृत्ती जाऊन अनुभवरूपता शिल्लक राहते. तरी हे शिष्या या चर्चेत अजून तू खरा जागा झालेला नाहीस. मी अजन्मा आहे हे आलेले भान स्वप्नातले आहे. या जागेपणात स्वप्नवृत्ती शिल्लक आहे. स्वप्नातच मी जागा झालो असे ज्याप्रमाणे वाटते त्याप्रमाणे मीच तो अजन्मा आहे असे या अनुभवाचे लक्षण आहे. हा अनुभव खरा जरी असला तरी थोडा भ्रम शिल्लक आहेच. संपूर्ण जागेपणा याच्या पल्याड आहे. जो शब्दांनी सांगता येत नाही. म्हणून त्यास अनिर्वाच्य म्हणतात.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती