सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
  पर्यटन

एक वनविहार ( 5 जून- जागतिक पर्यावरण दिन).

MSK    05-06-2024 21:50:42

"एक वनविहार"

( 5 जून- जागतिक पर्यावरण दिन). 

-----------------------------------------------------

पाचगणी ते महाबळेश्वर रोडवर सुप्रसिद्ध मॅप्रो गार्डन आहे.आणि त्याच्या विरुद्ध दिशेला गुरेघर वनपरिक्षेत्र आहे.सरकारी असूनही जंगल पाहण्यासाठी छान सोय व्यवस्था आहे.मेनरोडला लागून मॅप्रो गार्डनच्या थोडे पुढे गेल्यानंतर त्यांची फॉरेस्ट चौकी आहे. गेटमधून आत मध्ये गेल्यावर प्रत्येकी पंचवीस रुपये फी भरून  जंगलाचा फेरफटका करता येतो.या जंगलात साधारण दीड किलोमीटर चढाचा रस्ता पार केल्यावर सुप्रसिद्ध त्रिवेणी पॉईंट चबुतरा आहे. 

 

महाबळेश्वरचे प्रेक्षणीय स्थळे व पॉईंट्स आम्ही खूप वेळा पाहिलेत. परंतु जंगल सफारी कधी केली नव्हती .म्हणून नुकतीच आमची जोडी विवाहाच्या  वर्धापनदिनाच्या निमित्ताने,यावेळी महाबळेश्वरच्या गुरेघर जंगलात, पायी सफारीसाठी सकाळी आठ वाजता हजर झाली. फॉरेस्ट रेंजरने आतमध्ये जंगली पशु,पक्षी,किटके वनस्पती भरपूर आहेत परंतु ते  उपद्रवकारक नाहीत व त्यामुळे काहीही धोका नाही अशी ग्वाही दिल्यामुळे आम्ही बिनधास्त या वनामध्ये घुसलो. 

 

 नुकताच पाऊस येऊन गेल्यामुळे जंगली मृद्धगंध मन प्रफुलित करत होता. जंगलातील रोपटी व पाने नुकत्याच येऊन गेलेल्या पहिल्या पावसामुळे धुऊन निघाली होती व त्यामुळे तजेलदार दिसत होती.न्हाऊ केलेल्या नवथर नववधूप्रमाणे त्यां हिरव्या निसर्गाचे जणू स्वरूप होते.  सुरुवातीच्या दहा-पंधरा मिनिटातच आमचे मन मोहून गेले. फोटो आणि व्हिडिओची हौस आम्ही पूर्ण केली.जंगलाच्या निम्म्या वाटेत जाईपर्यंत वेगवेगळ्या पक्षांचे मधुर आवाज,विविध प्रकारचे छोटेमोठे लोभस व लाजरे बूजरे प्राणी,सरपटणारे जीव ,सरडे,खारी,पानाफूलातून फिरणारे फुलपाखरे, मधमाश्या ,भुंगे  उड्या मारणारे माकडे व इतरांनी दर्शन दिले व आमचे भरपूर मनोरंजन केले. 

 

जसे जसे आम्ही पुढे चढण पार करत होतो,निवांत चाललो होतो,तसतसे जंगलातली निरव शांतता मनामध्ये व डोळ्यांना सुंदर भासत असली तरी मेंदूमध्ये भयाण वाटत होती. कारण त्या अख्ख्या जंगलामध्ये आम्ही फक्त दोघेच प्रवासी होतो.गेटवरच्या फॉरेस्ट रेंजरला सुद्धा आमच्या धाडसाचे कौतुक वाटले होते. सौ.वर्षा कृषीकन्या असल्यामुळे व मुळातच साहसी असल्याने काही प्रॉब्लेम आला नाही. तिचे मनोरंजन व्हावे म्हणून मी जंगलासंबंधित बॉलीवूड गाणी खूप मोठमोठ्यां आवाजात म्हणत होतो.

 

उभी चढण व काटेकुटे असलेला जंगलातील पायवाट रस्ता सहजतेने पार करण्यासाठी नंतर मला एक भन्नाट कल्पना सुचली.आम्ही उंच पहाडी महाबळेश्वरच्या सर्वोच्च जागेवर असल्यामुळे आमच्या मोबाईलला चांगलीच रेंज होती,त्यामुळे तिथून आम्ही नातवंडांना व्हिडिओ कॉल केला व त्यानंतर जंगल दर्शनासोबत वर्षाची कॉमेंट्री चालू झाली व तिने जंगलाची संपूर्ण माहिती त्यांना सांगत सांगत आम्ही त्रिवेणी पॉईंटवर केव्हा पोचलो,ते आम्हां दोघांना समजलेच नाही.

 

त्रिवेणी पॉईंटच्या चबुतऱ्यावर पोचल्यावर मात्र आमचे मन अतिशय आनंदाने फुलले. महाबळेश्वरचा तो सर्वोच्च पॉईंट आहे.मंजिल गाठल्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे.तिथून चारी दिशेला वेगवेगळे महाबळेश्वरची हिरवी रूपे पाहिले. एका बाजूला कृष्णा खोरे व धोम धरण,दुसऱ्या बाजूला वेण्णा लेक,तिसऱ्या दिशेला प्रतापगड,आणि चौथ्या दिशेला सह्याद्रीची न संपणारी सलग रांग,काही ठिकाणी तेथील गावे,हॉटेल्स,रिसॉर्ट्स वगैरे एकदम क्लिअर दिसत होते.नयन रम्य दृश्य पाहून "बस्स दिल खुश हो गया" म्हणत भरपूर फोटो काढले व रिल्स बनवले. अतिशय उत्साह व आनंदात आम्ही तेथे अर्धा तास  घालवला.तिथून परत फिरायचे मन होत नव्हते परंतु सकाळच्या पायपिटीमुळे भुकेची जाणीव झाली होती,म्हणून परत माघारी फिरायची ठरवले."समय तू धीरे, धीरे चल "असे म्हणत आम्ही परतीचा रस्ता धरला. 

 

शुद्ध ऑक्सिजन घेत,हिरव्या निसर्गाचा आदर करीत ,जंगलाचे सर्व नियम पाळून आम्ही हे ट्रेकिंग मनापासून पूर्ण केले.  परतीच्या प्रवासात येताना थकवा मात्र अजिबात जाणवला नाही.जंगलाचे व पर्यावरणाचे महत्त्व खूपच जाणवले. झाडाला लगडलेली फळे जसे की चवदार जांभळे ,करवंदे खात व गप्पा मारत बाहेरच्या गेटवर पोचलो. जंगलात मोफत असलेला हाच रानमेवा मॅप्रो गार्डनच्या आसपास चारशे रुपये किलोने विकणारे स्थानिक विक्रेते आम्ही पाहिले.या दोन तासांमधील जंगल फेरी,ही आपल्या सहजीवनातील सर्वश्रेष्ठ सहल आहे याची आम्ही दोघांनी अप्रत्यक्ष  कबुली दिली.

 

महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनच्या समोर असलेल्या वनपरिक्षेत्रात दोन तास वेळ काढून अनुभवलेले जंगल ट्रेकिंग व त्यानंतरच्या मॅप्रो गार्डनच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद हे आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी बनल्या आहेत. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे. झाडे लावा ,झाडे जगवा,जंगले वाचवा व पर्यावरणाचा समतोल राखा हा संदेश आम्हाला पटला आहे व त्याचे फायदे व उत्कृष्ट परिणाम आम्ही या सहलीमध्ये मस्तपैकी अनुभवले. 

-----------------------------

विलास बाबर.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती